आरोपी नसताना अभिनेत्रींचे फोन जप्त कसे केले?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 02:43 AM2020-09-30T02:43:16+5:302020-09-30T02:43:45+5:30
काय? का? कसे?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी सध्या बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाचा तपास करतेय. यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एनसीबीने दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही चौकशी केली; पण या प्रकरणात त्या अद्याप आरोपी नाहीत, तरीही त्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. ते कसे काय? आरोपी नसतानाही वस्तू जप्त करता येतात?
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १०२ ने पोलिसांना काही अधिकार दिले आहेत. पोलिसांना एखाद्या खटल्याच्या तपासादरम्यान महत्त्वाची वाटलेली वस्तू जप्त करण्याचा अधिकार आहे. चोरी गेलेली किंवा त्याद्वारे एखादा गुन्हा घडू शकेल अशी वस्तू अथवा पुरावा म्हणून वापर करता येईल अशी वस्तू किंवा संशयास्पद वस्तू जप्त करण्याचा पोलिसांना अधिकार असतो. एनसीबीलाही असेच अधिकार मिळाले आहेत. एनडीपीएस कायद्याने एनसीबीला हे अधिकार आहेत. त्यामुळे दीपिका, सारा, श्रद्धा या तिघीही ड्रग्ज प्रकरणात आरोपी नसताना त्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
जप्त केलेल्या वस्तू परत कधी मिळतात?
जप्त वस्तूंमध्ये तपास अधिकाऱ्यांना काय आढळले, किती महत्त्वाची माहिती मिळाली, यावर जप्त वस्तू कधी मिळणार ते अवलंबून आहे. जर त्यात तपासाला पुरक असे पुरावा मिळाले नाहीत तर पोलीस अधिकारी किंवा त्या वस्तूंचा मालक ती वस्तू परत मिळवण्यासाठी संबंधित कोर्टात अर्ज करू शकतो. जर त्यात अत्यंत आवश्यक पुरावे सापडले तर खटला पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागू शकते.