पाच वर्षांत १३ लाखांवरून ४ कोटी कसे कमविले; तेजस्वी सूर्यांनी सांगितला गुंतवणुकीचा मार्ग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 14:48 IST2024-04-11T14:09:06+5:302024-04-11T14:48:21+5:30
BJP Tejasvi Surya Net Worth Rise : सूर्या यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बंगळुरु दक्षिणमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांनी त्यांची संपत्ती ४.१० कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे.

पाच वर्षांत १३ लाखांवरून ४ कोटी कसे कमविले; तेजस्वी सूर्यांनी सांगितला गुंतवणुकीचा मार्ग...
२०१९ च्या तुलनेत खासदारांच्या संपत्तीमध्ये २०२४ मध्ये कमालीची वाढ झालेली आहे. सर्वात तरुण खासदार भाजपाचे नेते तेजस्वी सूर्या यांच्या संपत्तीमध्ये कैकपटींनी वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती १३ लाखांवरून वाढून ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. ही एवढी वाढ कशी झाली याची माहिती सूर्या यांनीच दिली आहे.
सूर्या यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बंगळुरु दक्षिणमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांनी त्यांची संपत्ती ४.१० कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. २००९ मध्ये त्यांनी 13.46 लाख रुपये संपत्ती असल्याची जाहीर केले होते. पाच वर्षांत त्यांची संपत्ती 3.97 कोटी रुपयांनी वाढली आहे.
सूर्या यांनी या वाढलेल्या संपत्तीचा स्रोतही सांगितला आहे. त्यांनी शेअर बाजारात 1.79 कोटी रुपये आणि म्युच्युअल फंडामध्ये 1.99 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. संपत्तीमध्ये अचानक एवढ्या वाढीला सूर्या यांनी शेअर आणि म्यूचुअल फंडाची मोठी भुमिका असल्याचे म्हटले आहे.
सूर्या यांनी एका बिझनेस चॅनेलला मुलाखत दिली, यात त्यांनी यावर भाष्य केले. एसआयपी, म्युच्युअल फंड आणि स्टॉक्सद्वारे तुम्ही बाजारात पैसे गुंतवून मोठा फायदा कमवू शकता असे ते म्हणाले. अशाप्रकारे केलेल्या गुंतवणुकीचा देशातील अनेकांना फायदा झाला आहे, त्यातील मी एक आहे, असे सूर्या म्हणाले.
तेजस्वी सूर्या यांच्या म्युच्युअल फंडामध्ये २६ वेगवेगळे फंड आहेत. यामध्ये कॅनरा रोबेको मल्टी कॅप फंड, एचडीएफसी मल्टी कॅप फंड, कोटक स्मॉल कॅप फंड आणि आयसीआयसीआय प्रुडेशिंअल स्मॉल कॅप फंड आहेत. तर इक्विटी फंडामध्ये इंडस टावर्स, एवरेडी इंडस्ट्रीज इंडिया, बीएसई लिमिटेड आणि स्ट्राइड्स फार्मा सारख्या कंपन्यांचे शेअर्स आहेत. गेल्या पाच वर्षांत शेअर बाजार चढाच आहे. यामुळे याचा फायदा गुंतवणूक दारांना होत आहे.