प्रचारात ‘डीपफेक’ कसे रोखणार? उपाययोजनेसाठी मेटा, मायक्रोसॉफ्ट, गुगल, ओपनआय आल्या एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 07:53 AM2024-02-21T07:53:14+5:302024-02-21T07:55:04+5:30
काही दिवसांपूर्वी आघाडीचे अभिनेते तसेच राजकारण्यांचे डीपफेक समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती.
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी आघाडीचे अभिनेते तसेच राजकारण्यांचे डीपफेक समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. येणारे वर्ष निवडणुकांचे आहे. निवडणुकांच्या प्रचारात ‘डीपफेक’चा गैरवापर होऊन मतदारांची फसवणूक केली जाऊ शकते, ही भीती आता बड्या टेक कंपन्यांना सतावत आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी मेटा, मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि ओपनआय या कंपन्या एकत्र आल्या आहेत.
असा विद्वेष पसरविणारा कंटेंट रोखण्यासाठी कराराची घोषणा शुक्रवारी म्युनिच येथील सुरक्षा संमेलनात केली जाईल. अडोब, गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, ओपनआय, टिकटॉकसह अन् कंपन्या यावर काम करीत आहेत. (वृत्तसंस्था)
कंपन्या नेमके काय करणार?
nप्रचाराच्या काळात समाजविघातक मूल्यांकडून या तंत्रज्ञानाचा गैरवापर झाल्यास युजर्सची फसवणूक होऊ शकते. यात आपली नाहक बदनामी होईल, अशी भीती कंपन्यांना वाटत आहे.
nप्रसारित करण्यात आलेल्या कंटेंटमधून ‘एआय’च्या आधारे तयार केलेले फोटो, व्हिडीओ, ऑडीओ हेरणे, त्यांचे लेबलिंग आणि त्यावरील नियंत्रण यासाठी यंत्रणा तयार केली जात आहे.
nमेटा, गुगल तसेच ओपनएआयने आधीपासून एआयच्या आधारे तयार केलेल्या कंटेंटवर एकाच प्रकारचे विशिष्ट वॉटर मार्किंग करण्यासाठी सहमती दर्शविली आहे. यामुळे अशा कंटेटवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
अनेक देशांमध्ये निवडणुका असल्याने येणारे वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या काळात ‘एआय’चा गैरवापर टाळण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.
-प्रवक्ता, मेटा