देशातील रस्ते असुरक्षित? दर तासाला 53 अपघात, वर्षाला दीड लाख लोकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 03:15 PM2019-07-24T15:15:31+5:302019-07-24T15:16:42+5:30
2017 मधील आकड्यांवरुन भारतात दर तासाला 53 रस्ते अपघात होतात.
नवी दिल्ली : मोटर वाहन(संशोधन) विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकासाठी मोटर वाहन कायदा 1988 मध्ये सुधारणा करुन मंजूर करण्यात आले आहे. याआधी हे विधेयक 2017 मध्ये संसदेत सादर करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी या विधेयकाला मंजूरी मिळाली नव्हती.
दरम्यान, लोकसभेत रस्ते अपघातासंदर्भात काही आकडे सादर करण्यात आले. त्यावरुन असे समजते की भारतात रस्ते असुरक्षित आहेत. 2017 मधील आकड्यांवरुन भारतात दर तासाला 53 रस्ते अपघात होतात. ज्यामध्ये 17 लोकांचा मृत्यू होतो. तर देशात वर्षाला 1,47,913 लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याशिवाय, राज्यानुसार पाहिले तर भारतात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात रस्ते अपघात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र आणि चौथ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, भारतातील लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात एकही रस्ते अपघात झाला नाही. तर अंदमान-निकोबार, दमन-दीव, नागालँड आणि दादर नगर हवेली यासारख्या केंद्रशासित प्रदेशात रस्ते अपघातात 50 पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते.
दरम्यान, रस्ते अपघात टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोटर वाहन(संशोधन) विधेयकात अनेक गाइडलाइन्स घातल्या आहेत. या विधेयकात रस्ते वाहतुकीचे नियम मोडल्यास कठोर दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. रस्त्यावर गाडी चालवताना थोडीशी चूक झाल्यास चालकाला मोठा दंड भरावा लागणार आहे. बेदरकारपणे गाडी चालवणे किंवा हेल्मेटशिवाय गाडी चालवणे, सीट बेल्ट न बांधणे आणि दारूच्या नशेत गाडी चालवण्यासारख्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर दंड भरावा लागणार आहे.