हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 12:55 PM2024-10-09T12:55:47+5:302024-10-09T12:57:30+5:30
Haryana Election Results 2024: विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असला तरी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या सरकारमधील १० पैकी ८ मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचा निवडणुकीत पराभूत झाले आहेत.
Haryana Election Results 2024: चंदीगड : भाजप हरयाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार बनविणारा पक्ष ठरला आहे. विधानसभेच्या ९० भाजपनं ४८ जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसनं ३७ जागा जिंकल्या. २०१४ नंतर हरयाणात भाजपनं स्वबळावर पहिल्यांदाच बहुमत मिळवलं आहे. दरम्यान, २०२४ च्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असला तरी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या सरकारमधील १० पैकी ८ मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. फक्त दोन मंत्र्यांचा विजय झाला आहे.
'या' आठ मंत्र्यांचा पराभव
- ज्ञानचंद गुप्ता (विधानसभा अध्यक्ष)- पंचकुला
- सुभाष सुधा- थाणेसर
- संजय सिंह- नूंह
- असीम गोयल- अंबाला शहर
- कमल गुप्ता- हिसार
- कंवर पाल- जगाधरी
- जेपी दलाल- लोहारू
- अभे सिंग यादव- नांगल चौधरी
- रणजितसिंह चौटाला – रानियां (अपक्ष)
अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, पण...
हरयाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार असले तरी आठ मंत्र्यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामध्ये रानियां मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रणजितसिंह चौटाला यांचा समावेश आहे. ज्यांचे तिकीट भाजपनं रद्द केलं आहे. त्यानंतर त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. या जागेवर INLD चे अर्जुन चौटाला विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत हिसारमधून रणजितसिंह चौटाला यांना भाजपनं तिकीट दिलं होतं, मात्र येथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांचाही पराभव
विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांचाही पंचकुला जागेवर काँग्रेसच्या चंदर मोहन यांनी पराभव केला. याशिवाय, ठाणेसरमध्ये भाजपच्या सुभाष सुधा यांचा काँग्रेसच्या अशोक अरोरा यांनी तीन हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. नूहंमध्ये भाजपचे संजय सिंह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसचे आफताब अहमद यांनी INLD उमेदवार ताहिर हुसेन यांचा ४६ हजारांहून अधिक मतांनी पराभव करून ही जागा जिंकली आहे. मुख्यमंत्री सैनी यांचे कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते असीम गोयल यांचाही अंबाला सिटी मतदारसंघातून पराभव झाला. त्यांचा काँग्रेसचे निर्मल सिंह मोहरा यांनी ११,१३१ मतांनी पराभव केला.
हिसार-लोहारू आणि नांगल चौधरीमध्येही भाजपचा पराभव
हिस्सारमध्ये भाजपच्या डॉ.कमल गुप्ता तिसऱ्या क्रमांकावर आल्यानं त्यांचा पराभव झाला. येथून अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांनी काँग्रेसच्या राम निवास राणा यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला. याशिवाय, जगाधरी जागेवर भाजपचे उमेदवार कंवर पाल यांचा काँग्रेसच्या अक्रम खान यांच्याकडून पराभव झाला. लोहारू येथे जयप्रकाश दलाल यांचा काँग्रेसचे उमेदवार राजबीर फर्तिया यांनी अवघ्या ७९२ मतांनी पराभव केला. त्याचवेळी नांगल चौधरी मतदारसंघातून भाजपचे अभय सिंह यादव यांचा काँग्रेसच्या मंजू चौधरी यांनी पराभव केला आहे.
'हे' दोन मंत्री झाले विजयी
विजयी मंत्र्यांमध्ये पानिपत ग्रामीण मतदारसंघातून राज्यमंत्री महिपाल धांडा आणि बल्लभगड मतदारसंघातून कॅबिनेट मंत्री मूलचंद शर्मा यांचा समावेश आहे.