राजकारणात चांगले लोक आल्याशिवाय पोकळी कशी भरून निघेल?

By admin | Published: May 17, 2017 08:13 PM2017-05-17T20:13:08+5:302017-05-17T20:13:08+5:30

राजकारणाबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. ज्याला काही येत नाही तो राजकारणात नेता होतो आणि देशात व राज्यात जे काही वाईट घडते, त्याला नेतेच जबाबदार आहेत

How will the cavity fill itself when there are good people in politics? | राजकारणात चांगले लोक आल्याशिवाय पोकळी कशी भरून निघेल?

राजकारणात चांगले लोक आल्याशिवाय पोकळी कशी भरून निघेल?

Next

सुरेश भटेवरा
नवी दिल्ली, दि. 17 : राजकारणाबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. ज्याला काही येत नाही तो राजकारणात नेता होतो आणि देशात व राज्यात जे काही वाईट घडते, त्याला नेतेच जबाबदार आहेत, असे अनेकांना वाटते. प्रत्यक्षात जनतेचे जीवनमान ज्या व्यवस्थेवर अवलंबून आहे ती लोकशाही व्यवस्था राजकारणाशीच संलग्न आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत घडणाऱ्या अनेक घटनांशी संबंधित निर्णय ही व्यवस्थाच घेत असते. या व्यवस्थेचे संचालन करण्यासाठी लोकसंपर्क असलेले चांगले लोक राजकारणात आले नाहीत तर जनतेला वाटणाऱ्या भीतीची पोकळी कधीच भरून निघणार नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने जो पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार केला आहे, तो निश्चितच उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
दिल्लीच्या कॉन्स्टिटयुशन क्लब आॅफ इंडियाच्या सभागृहात, म्हाळगी प्रबोधिनीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केलेल्या ‘नेतृत्व, राजकारण व शासन व्यवस्था’ या विषयांशी निगडीत पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे औपचारिक उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास विशेष अतिथी या नात्याने व्यासपीठावर माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी, पी. मुरलीधर राव आदी मान्यवर उपस्थित होते. म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांनी उद्घाटन सोहयाचे प्रास्ताविक केले.
दिवंगत नेते प्रमोद महाजनांच्या संकल्पनेतून तयार झालेली म्हाळगी प्रबोधिनी १९८२ पासून मुंबईतील भार्इंदर भागात १५ एकर प्रशस्त जागेत कार्यरत आहे. आदर्श समाजसेवक व लोकप्रतिनिधी तयार करणे, व विविध समाजोपयोगी उपक्रम व कार्यक्रमांसाठी आपले दालन उपलब्ध करून देणे हा संस्थेचा प्राथमिक उद्देश आहे. संस्थेने यंदाच्या वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन लिडरशिप पॉलिटिक्स अँड गव्हर्नन्स या महत्वाकांक्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रारंभ केला असून पहिल्या वर्षात ४0 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. या अभ्यासक्रमासाठी १७ मे ते २0 जून दरम्यान प्रवेश अर्ज स्वीकारले जातील व २५ जून रोजी मुलाखतीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर होईल. ३0 जून रोजी होणाऱ्या मुलाखतीव्दारे यातील ४0 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून ५ जुलै पर्यंत प्रवेश प्रक्रिया पार पडल्यावर १ आॅगस्ट पासून या अभ्यासक्रमाचा प्रत्यक्ष प्रारंभ होईल. कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तिर्ण असणाऱ्याला इंटर्नशिपसह ९ महिने चालणाऱ्या या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल. प्रवेश अर्ज १ हजार रूपयंना आहे. या निवासी अभ्यासक्रमासाठी फिल्ड व्हिजिट, वसतीगृह तसेच भोजनालय इत्यादी खर्चांसह एकुण फी ची रक्कम २.५0 लाख रूपये आकारण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाचे प्रमुख पी. मुरलीधर राव व संस्थेचे उपाध्यक्ष खासदार सहस्त्रबुध्दे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.
उद्घाटन सोहळयात बोलतांना माजी निवडणूक आयुक्त कुरेशी म्हणाले, भारतीय लोकशाही केवळ जगातली सर्वात मोठी लोकशाही नव्हे तर जगातल्या ९0 देशांच्या एकुण मतदारांची बेरीज केली तरी त्यापेक्षा भारतीय लोकशाहीचा आकार मोठा आहे. इतक्या अवाढव्य व्यवस्थेचे संचालन आदर्श पध्दतीने व्हावे यासाठी सरकार चालवणारे मंत्री, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, त्यांचे लहान मोठे नेते या सर्वांनाच खास प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. लोकशाही व्यवस्थेच्या कामकाजाबाबत तसेच निवडणुकांबाबत लोकशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार हाती असतांना २५ जानेवारी हा दिवस भारतीय
मतदार दिन घोषित करून एकही अलाहिदा रूपया न खर्च करता आयोगाने व्यापक जनजागृतीचा उपक्रम सुरू केला. नव्या अभ्यासक्रमाला कुरेशींनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: How will the cavity fill itself when there are good people in politics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.