Howdy Modi : बेरोजगारी सोडून भारतात सारे काही आलबेल, पी. चिदंबरम यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 12:23 PM2019-09-23T12:23:38+5:302019-09-23T12:24:28+5:30
आयएनएक्स मीडिया खटल्या प्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या पी. चिदंबरम यांनी हाऊडी मोदी कार्यक्रमावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया खटल्या प्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या पी. चिदंबरम यांनी हाऊडी मोदी कार्यक्रमावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. भारतामध्ये सारे काही छान चालले आहे. आलबेल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्युस्टन येथील कार्यक्रमादरम्यान सांगितले होते. त्यावरून चिदंबरम यांनी मोदींवर टीका केली आहे. भारतात रोजगार सोडून सारे काही छान चालले आहे, असा टोला त्यांनी मोदींना लगावला आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज पी. चिदंबरम यांची भेट घेतली. त्यानंतर पी. चिदंबरम यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली. ''रोजगारावर आलेले संकट, मॉब लिंचिंग, काश्मीरमधील परिस्थिती, विरोधी पक्षांच्या नेत्यांची तुरुंगात करण्यात आलेली रवानगी आणि कमी वेतनमान हे सारे सोडून भारतात सारे काही चांगले आहे, आलबेल आहे,'' असे ट्विट चिदंबरम यांनी केले आहे.
Bharat mai sab achha hai.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) September 23, 2019
Except for unemployment, loss of existing jobs, lower wages, mob violence, lockdown in Kashmir and throwing Opposition leaders in prison.
ह्युस्टन येथील एनआरजी स्टेडियममध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर भाषणात मोदींनी मराठी व इतर भारतीय भाषांमधून प्रेक्षकांना त्यांची खुशाली विचारली. तसेत भारतात सर्व छान चालले आहे, असे त्यांनी मराठीत सांगितले होते, त्यावरून चिदंबरम यांनी मोदींना टोला लगावला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ह्युस्टनमधल्या एनआरजी स्टेडियममध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या 50 हजार भारतीयांना मोदी यांनी संबोधित केले. उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर भाषणाला मोदींनी हिंदीतून सुरूवात करतानाच तेथील जनसमुदाय, उत्साह, जल्लोष याचा उल्लेख केला. हे दृश्य, हा माहोल अकल्पनीय आहे. टेक्सासच्या इतिहासात हे अविश्वसनीय आहे. हा अपार जनसमूह उपस्थित आहे. ही संख्या गणितात मोजता येणारी नाही. नवा इतिहास घडतो आहे. ट्रम्प यांचे येणे हे अमेरिकेच्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे, असे म्हटले होते.