VIDEO: हाऊ इज द जोश? पंतप्रधान मोदींचा 'उरी' स्टाईल संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 07:16 PM2019-01-19T19:16:07+5:302019-01-19T19:20:36+5:30
उरी चित्रपटातील डायलॉग म्हणत मोदींचा चित्रपटसृष्टीतील मान्यवरांशी संवाद
मुंबई: भारतीय चित्रपटाच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींशी संवाद साधला. सरकार पायरसीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी मोदींनी उरी चित्रपटातील डायलॉगदेखील म्हटला. 'हाऊ इज द जोश?' हा अभिनेता विकी कौशलचा डायलॉग म्हणत मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला.
भारतीय लष्करानं 2016 मध्ये पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक केला. उरीतील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यावर आधारित उरी चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. याच चित्रपटातील डायलॉग म्हणत मोदींनी राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्यांशी संवाद साधला. मोदींनी 'हाऊ इज द जोश', म्हणताच उपस्थितांनी 'हाय सर' म्हणत प्रतिसाद दिला. यावेळी टाळ्यांचा कडकडाटही झाला. यानंतर तुमच्या या नव्या जोशाची सध्या देशात सर्वत्र चर्चा आहे. नव्या भारतासाठी तुमचा हा जोश खूप महत्त्वाचा आहे, असं मोदी म्हणाले.
#WATCH: PM Modi asks "How's the josh?" at the inauguration of National Museum of Indian Cinema in Mumbai. The audience responds with "High Sir" pic.twitter.com/Da3y1xUiuP
— ANI (@ANI) January 19, 2019
सिनेमॅटोग्राफी कायद्यात बदल करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. पायरसी रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. देशातील गरिबीबद्दलचे चित्रपट आपण आजवर पाहिले आहेत. मात्र आता प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटांमधून समस्यांसोबतच त्यांचं निराकरण कसं करता येईल, याचं चित्रणदेखील केलं जातं, असं मोदी म्हणाले.