डिटोनेटर्सचा भीषण स्फोट

By admin | Published: September 13, 2015 05:08 AM2015-09-13T05:08:42+5:302015-09-13T05:08:42+5:30

मध्य प्रदेशच्या झाबुआ या आदिवासी जिल्ह्यातील पेटलावद येथे एका घराच्या तळघरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या स्फोटकांचा (डिटोनेटर्स) शनिवारी सकाळी भीषण स्फोट

A huge explosion of detonators | डिटोनेटर्सचा भीषण स्फोट

डिटोनेटर्सचा भीषण स्फोट

Next

- ९० ठार; १०० जखमी

इंदूर : मध्य प्रदेशच्या झाबुआ या आदिवासी जिल्ह्यातील पेटलावद येथे एका घराच्या तळघरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या स्फोटकांचा (डिटोनेटर्स) शनिवारी सकाळी भीषण स्फोट होऊन ९० जण ठार, तर शंभरावर जखमी झाले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू असून, राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आणखी काही लोक मलब्याखाली दबले असण्याची दाट शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. दिल्लीतून प्राप्त वृत्तानुसार, बचाव आणि मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
घराजवळील तीन मजली सेठिया हॉटेलमधील गॅस सिलिंडर फुटल्याने स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. पण नंतर स्फोटकांच्या साठ्याचे कारण पुढे आले. शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास सेठिया हॉटेलजवळच असलेल्या प्रसिद्ध व्यापारी राजेंद्र कासवा यांच्या घरात पहिला स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की घरासह सेठिया हॉटेल पूर्ण उद्ध्वस्त झाले. या स्फोटाचा आवाज ऐकून मोठ्या संख्येत लोक घटनास्थळी पोहोचत नाहीत तोच एकापाठोपाठ एक स्फोटांची मालिकाच सुरू झाली. यात काही घरांच्या भिंती कोसळल्या़ जवळपास ५० घरे आणि दुकानांना भेगा पडल्या. हॉटेलातील आणि लगतच्या घरांतील सर्व लोक मृत्युमुखी पडले. (प्रतिनिधी)

स्फोटांमुळे उडालेल्या दगडांनी अनेक जखमी
स्फोटांमुळे उडालेल्या दगडांनी तेथून जाणारे अनेक लोक जखमी झाले. स्फोटांची ही मालिका संपल्यानंतर संपूर्ण परिसरात मृतदेहांचा अक्षरश: खच पडला होता. धूळ आणि धुराने आकाश व्यापले होते. जखमी मदतीसाठी आर्त हाक देत होते. या दुर्घटनेचे एक प्रत्यक्षदर्शी बाबूलाल यांच्या सांगण्यानुसार, ते घटनास्थळापासून अर्धा किमी अंतरावर कृष्णा हॉटेलमध्ये चहा घेत असताना त्यांनी जोरदार धमाक्याचा आवाज ऐकला. आकाशातून दगडांचा वर्षाव सुरूहोता. स्फोटस्थळी पोहोचले तेव्हा दीडशेच्या जवळपास लोक जमिनीवर पडले होते. काही जखमी तडफडत होते.

डिटोनेटरमुळे स्फोट... अतिरिक्त पोलीस अधीक्षक सीमा आल्वा यांनी सांगितले, की हे स्फोट डिटोनेटरमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हॉटेलजवळच घर असलेल्या कासवा यांचा खतांचा व्यवसाय आहे. ते विहिरीसाठी स्फोटांचेही काम करीत होते. त्यांनी डिटोनेटर्सचा मोठा साठा तळघरातील गोदामात केला होता.

गृहमंत्र्यांची शोकसंवेदना
विश्व हिंदी संमेलनात सहभागी होण्यासाठी येथे आलेले केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पेटलावद घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त करून यातील मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना जाहीर केली.

स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मला अतीव दु:ख आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी शोकसंवेदना व्यक्त करतो. मध्य प्रदेश सरकार स्थितीवर नजर ठेवून आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: A huge explosion of detonators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.