नोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 09:25 AM2018-04-21T09:25:28+5:302018-04-21T09:25:28+5:30
संशयास्पद व्यवहारांची संख्या चारपटीनं वाढली
नवी दिल्ली: नोटाबंदीनंतरच्या आर्थिक वर्षात देशभरातील बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नोट्या जमा झाल्या आहेत. याआधी बँकांमध्ये कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आल्या नव्हत्या. याशिवाय 2016-17 या आर्थिक वर्षात संशयास्पद व्यवहारांमध्ये तब्बल 480 टक्क्यांची वाढ झाली आहे. फायनान्शियन इन्टेलिजन्स युनिटच्या (एफआययू) अहवालातून ही बाब समोर आली आहे. वृत्तसंस्था पीटीआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
'2015-16 मध्ये 4.10 लाख बोगस नोटा आढळून आल्या होत्या. मात्र 2016-17 मध्ये यामध्ये मोठी वाढ झाली. या आर्थिक वर्षात नोटाबंदीनंतर 7.33 लाख बोगस नोटा आढळल्या', असे एफआययूनं अहवालात म्हटलं आहे. या अहवालात किती बोगस नोटा आढळून आल्या, त्याची आकडेवारी देण्यात आली आहे. मात्र या बोगस नोटांचे नेमकं मूल्य किती, याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अवघ्या वर्षभराच्या कालावधीत बँकेत जमा झालेल्या बनावट नोटांची संख्या तब्बल 3.23 लाखांनी वाढल्याचं या अहवालातील आकडेवारी सांगते.
बनावट नोटांसोबतच बँकेमधून होणाऱ्या संशयास्पद व्यवहारांची संख्यादेखील वाढली आहे. सरकारी आणि खासगी बँकांमध्ये 2016-17 या आर्थिक वर्षात 4.73 लाख संशयास्पद व्यवहार झाले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व व्यवहार नोटाबंदीनंतर झाले आहेत. 2015-16 च्या तुलनेत 2016-17 या कालावधीत झालेल्या संशयास्पद व्यवहारांचं प्रमाण चौपट असल्याची आकडेवारी अहवालातून समोर आली आहे.