रेल्वेचा जबरदस्त प्रकल्प, आता स्टेशन परिसरात जमा होणाऱ्या कचऱ्यातून होणार लाखोंची कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 05:20 PM2021-07-12T17:20:03+5:302021-07-12T17:21:07+5:30
रेल्वे स्थानकांच्या परिसरात आणि रेल्वे रुळांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. त्यामुळे मोठी समस्य निर्माण होते.
भारतीय रेल्वेनं अत्याधुनिकतेची कास धरली आहे. याच अंतर्गत आता रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्यासाठी आणि उत्पन्न वाढविण्यासाठी उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागानं नव्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे स्थानकांच्या परिसरात आणि रेल्वे रुळांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात होते. यात आता एका अनोख्या प्रकल्पाची सुरुवात दिल्ली विभागाकडून केली जाणार आहे. यात दिल्ली विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ३० रेल्वे स्थानकांवरील कचरा गोळा केला जाणार आहे.
रेल्वेच्या या अभिनव प्रकल्पात बहुतांश दिल्ली एनसीआर भागातील रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या रेल्वे स्थानकांवरील कचरा जमा करुन त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे आणि यातून रेल्वेच्या दिल्ली विभागाला १० लाखांची मिळकत मिळणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रकल्पाअंतर्गत रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापनात सुधारणा होणार आहे.
रेल्वेच्या या प्रकल्पासाठी लाहरी गेट येथे रेल्वेकडून मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी फॅक्ट्री उभारण्यात आली आहे. या प्लांटमध्ये ३० रेल्वे स्थानकांवर जमा होणाऱ्या कचऱ्यावर सुयोग्य पद्धतीनं प्रक्रिया केली जाणार आहे. यात ओला आणि सुखा कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर वेगवेगळ्या प्रवर्गाअंतर्गत कचऱ्याची वर्गवारी केली जाणार आहे. यातून बायोडिग्रेडेबल भाग कंपोस्ट करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. तर सुका कचरा व्यवस्थापनासाठी वेगळी प्रक्रिया केली जाणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लास्टिकच्या कचऱ्याला सीपीसीबीच्या माध्यमातून सात वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये वेगळं केलं जाणार आहे. त्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळानं निर्धारित केलेल्या अधिकृत वेस्ट टू एनर्जी प्लांटमध्ये हा कचरा पाठवण्यात येणार आहे.