शहरांत वाहनांची अफाट गर्दी, अपघात मात्र गावाकडे अधिक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 11:37 AM2023-01-21T11:37:54+5:302023-01-21T11:39:20+5:30

२०२१ मध्ये शहरी भागात ३७ टक्के तर ग्रामीण भागात ६३ टक्के नोंद

Huge rush of vehicles in the city but more accidents in the village | शहरांत वाहनांची अफाट गर्दी, अपघात मात्र गावाकडे अधिक!

शहरांत वाहनांची अफाट गर्दी, अपघात मात्र गावाकडे अधिक!

googlenewsNext

चंद्रकांत दडस

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहरी भागांमध्ये लोकसंख्येची घनता, वाहनांची गर्दी अधिक असतानाही ग्रामीण भागांमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक आहे. २०२१ मध्ये शहरी भागात १ लाख ५२ हजार (३७ टक्के), तर ग्रामीण भागात २ लाख ६० हजार अपघातांची (६३ टक्के) नोंद झाली आहे. याचवेळी शहरी भागात अपघातात ४७ हजार जणांचा मृत्यू झाला असून, ग्रामीण भागात मात्र हे प्रमाण दुप्पट म्हणजे १ लाख ६ हजार इतके अधिक असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालातून समोर आले आहे.

अपघात आणि मृत्यू कुठे वाढले?

२०१५ पासूनची आकडेवारी पाहिल्यास शहरी भागात घडणारे अपघात, मृत्यू आणि जखमी होणाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. ही सकारात्मक बाब असली तरी दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात अपघातांचे, मृत्यूंचे आणि जखमी होणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यांत?

राज्य    शहर    ग्रामीण

  • उत्तर प्रदेश    ७७९२    ११२३४ 
  • तामिळनाडू    ३७४७    ११००० 
  • महाराष्ट्र    ३४८६    ९०६८ 
  • मध्य प्रदेश    ३१४५    ७६६१ 
  • तेलंगणा    २७२६    ४३५४

 

५३५२ - ठिकाणी राष्ट्रीय महामार्गांवर ब्लॅक स्पॉट असून, तिथे अपघात होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

वाहनांच्या सुरक्षेसाठी काय?

  • एअरबॅग्ज
  • रिव्हर्स पार्किंग सेन्सर
  • ॲन्टी लॉक ब्रेकिंग प्रणाली (एबीएस)
  • कम्बाइन्ड ब्रेकिंग प्रणाली (सीबीएस)
  • सीट बेल्ट रिमाईंडर
  • ओव्हर स्पिड इशारा प्रणाली
  • मुले बाईकवर असल्यास वेगमर्यादा ४० किमी प्रति तास

 

मंत्रालय काय करतेय?

रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. यासाठी प्रचार आणि जनजागृती मोहीम, रस्ता सुरक्षा अभियान आणि अभियांत्रिकी पातळीवरही प्रयत्न करीत आहे. ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात असे ब्लॅक स्पॉट शोधून तेथे उपाय केले जात आहेत. वाहतूक नियम पाळण्यासाठी नियम मोडल्यास दंडाची रक्कमही प्रचंड वाढविण्यात आली आहे.

शहरात तत्काळ उपचार

अहवालानुसार, शहरी भागात अपघात झाल्यानंतर तत्काळ उपचारांच्या सुविधा मिळतात; मात्र ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अतिशय कमी असल्याने तत्काळ उपचार मिळत नाहीत. परिणामी शहरांच्या तुलनेत अपघातांमध्ये मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे.

Web Title: Huge rush of vehicles in the city but more accidents in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात