सावकाराच्या जाचामुळे तिघांनी केले आत्मदहन, मानवी हक्क आयोगाने घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:35 AM2017-10-26T04:35:24+5:302017-10-26T04:35:33+5:30
नवी दिल्ली : सावकार आणि पोलिसांच्या जाचापायी दोन मुलांसह दाम्पत्याने आत्मदहन केल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने तामिळनाडू सरकारला नोटीस जारी केली आहे.
नवी दिल्ली : सावकार आणि पोलिसांच्या जाचापायी दोन मुलांसह दाम्पत्याने आत्मदहन केल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने तामिळनाडू सरकारला नोटीस जारी केली आहे. ही घटना २३ आॅक्टोबर रोजी तिरुनेलवेली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घडली होती.
समाजमन हादरवून सोडणा-या या धक्कादायक घटनेची चित्रे सोशल मीडियावर झळकली होती. हा प्रकार धक्कादायकच नव्हे, तर पोलीस आणि अधिका-यांचा निष्काळजीपणा दाखवणारा आहे, असे मानवी हक्क आयोगाने म्हटले आहे. इसाक्की मुत्तू आणि सुब्बुलक्ष्मी या दाम्पत्याने दोन आणि पाच वर्षांच्या मुलांसह आत्मदहन केले होते. सुब्बुलक्ष्मी आणि दोन मुलांचा होरपळल्याने जागीच मृत्यू झाला होता, तर इसाक्की मुत्तूचा तिरुनलवेली येथील शासकीय इस्पितळात मृत्यू झाला होता. या दाम्पत्याने जिल्हाधिका-यांना सावकाराच्या जाचापासून सुटका करण्यासाठी विनवण्या करूनही प्रशासनाने काहीच केले नाही. घटनेची दखल घेऊन आयोगाने राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे. सावकाराचे १ लाख ४५ हजार रुपयांचे कर्ज व व्याज असे २ लाख ३४ हजार चुकते करूनही सावकार दोन लाख रुपये द्या म्हणून सारखा तगादा लावून या दाम्पत्याचा छळ करीत होता, असे आयोगाने म्हटले आहे.