मानवी हक्क संघटनांना गुन्हेगारासारखी वागणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 03:58 AM2018-10-27T03:58:46+5:302018-10-27T03:58:52+5:30
देशातील मानवी हक्क संघटनांना केंद्र सरकार गुन्हेगारांप्रमाणे वागवत आहे, असा आरोप अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे कार्यकारी संचालक आकार पटेल यांनी केला.
बंगळुरू : देशातील मानवी हक्क संघटनांना केंद्र सरकार गुन्हेगारांप्रमाणे वागवत आहे, असा आरोप अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे कार्यकारी संचालक आकार पटेल यांनी केला. परकीय चलनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने या संस्थेच्या दोन कार्यालयांवर गुरुवारी धाडी टाकल्या होत्या.
त्यावर आकार पटेल म्हणाले की, सर्व कायद्यांचे अॅम्नेस्टी इंडिया काटेकोर पालन करते. पारदर्शकता व विश्वासार्हता हे आमच्या कार्याचे मुख्य सूत्र आहे. या संस्थेला विदेशी देणगी नियंत्रण कायद्यांतर्गत देण्यात आलेला परवाना गृहखात्याने २०१० साली रद्द केला होता.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया फाऊंडेशन या दोन संस्थांचा परस्परसंबंध काय आहे, याविषयी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्याबद्दल पटेल म्हणाले की, संचालनालयाने मागितलेली सर्व कागदपत्रे समाजमाध्यमांवर आधीच उपलब्ध आहेत. तसेच ही कागदपत्रे याआधीही ईडीला दिली होती. अॅम्नेस्टी इंडियाच्या विद्यमान रचनेची माहिती संस्थेच्या वेबसाईटवर २०१४ पासून आहे.
सहा वर्षांत अॅम्नेस्टी इंडियाच्या कार्याला ४० लाख भारतीयांनी पाठिंबा दिला, तसेच एक लाख नागरिकांनी संस्थेला देणग्या दिल्या. या संस्थेची बँक खाती ईडीने गोठवली आहेत. अशीच कारवाई ग्रीनपीस इंडिया या संस्थेविरोधात केंद्र सरकारने केली होती. (वृत्तसंस्था)
>आणीबाणीची पुनरावृत्ती
जगातले कोणतेही राष्ट्र असो, तिथे मानवी हक्क रक्षणासाठी लढा देणे, हे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्य काम आहे. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांनुसारच आम्ही मानवाधिकारांसाठी काम करीत आहोत. आणीबाणीच्या काळात झालेली दडपशाही हा भारताला लागलेला कलंक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्याच दडपशाहीची आठवण व्हावी अशा घटना सध्या भारतात पुन्हा घडताना दिसत आहेत, अशी टीकाही पटेल यांनी केली.