माणुसकीला सलाम! देहरादूनच्या तरुणानं घेतली कोरोनानं पालक गमावलेल्या १०० चिमुकल्यांची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 06:14 PM2021-07-02T18:14:34+5:302021-07-02T18:17:03+5:30
कोरोनाच्या संकटाला संपूर्ण जग सामोरं जात असलं तरी माणुसकी अजूनही जीवंत आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे देहरादूनचा जय शर्मा
कोरोनानं संपूर्ण जगात हाहाकार केला आणि माणसाची कसोटीच घेतली. कोरोनाचा सामना करताना अनेक संकटं समोर येताना दिसली, तर दुसऱ्या बाजूला अनेक मदतीचे हात देखील पुढे आलेले पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात आजवर अनेक चिमुकल्यांच्या डोक्यावरचं छत्र हरवलं आहे. त्यामुळे या मुलांची काळजी आणि त्यांचं संगोपन कसं होणार असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Humanity Is Alive: Dehradun Man To Adopt 100 Kids Who Lost Both Parents to COVID-19)
देशात अनेक लहान मुलांनी आपल्या आई आणि वडील अशा दोघांनाही कोरोनामुळे गमावलं आहे. अशा मुलांच्या भवितव्यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे. पण त्याचसोबत काही सामाजिक संस्था देखील पुढे येत आहेत. देहरादूनचा जय शर्मा देखील एक असाच समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवणाऱ्यापैंकी एक तरुण आहे. त्यानं कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या एकूण १०० चिमुकल्यांचं पालकत्व स्वीकारलं आहे. जय शर्माच्या या पुढाकाराचं कौतुक करावं तितकं कमी आहे. जय शर्माच्या रुपातून माणुसकी अजूनही जीवंत आहे याची जाणीव समाजाला होत आहे.
जय शर्मा हा तरुण 'जस्ट ओपन युवरसेल्फ' (Just Open Yourself) या सामाजिक संस्थेचा संस्थापक आहे. त्यानं आपल्या संस्थेच्या फेसबुक पेजवर कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या एकूण १०० मुलांचं पालकत्व स्वीकारणार असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करण्याआधीच जयनं २० मुलांचं पालकत्व याआधीच स्वीकारलं आहे. मुलांच्या शिक्षण, आरोग्य इतर सर्व गोष्टींची जबाबदारी जय आपल्या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे.
येत्या आठवड्यात ५० मुलांचं लक्ष्य पूर्ण करण्याचं त्याचं उद्दीष्ट आहे. जय शर्माच्या संस्थेची संपूर्ण टीम गावोगावी पोहोचून पालक गमावलेल्या मुलांची माहिती गोळा करत आहे. अशा गावांसाठी संस्थेच्या माध्यमातून ग्रामप्रधान म्हणून एका सदस्याची नेमणूक करण्यात येणार आहे. ग्रामप्रधान संबंधित गावातील पालकत्व गमावलेल्या मुलांना मदत आणि त्यांच्या संगोपनासाठी सर्व आवश्यक गोष्टींकडे लक्ष देण्याचं काम करणार आहे.
दरम्यान, जय शर्मा चालवत असलेल्या सामाजिक संस्थेकडून कोरोना काळात आजवर विविध माध्यमांतून मदत करण्यात आली आहे. यात मोफत ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देणं, कोविड मेडिकल कीट, सॅनिटायझेशन किट्स आणि इतर वैद्यकीय उपकरणं उपलब्ध करुन देण्याचं काम करण्यात आलं आहे.