हा शंभर टक्के राजकीय सूडच!
By admin | Published: December 9, 2015 11:24 PM2015-12-09T23:24:38+5:302015-12-09T23:24:38+5:30
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण हा ‘पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) घेण्यात येत असलेला शंभर टक्के राजकीय सूड’च असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.
नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरण हा ‘पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) घेण्यात येत असलेला शंभर टक्के राजकीय सूड’च असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तथापि न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. सरकारने मात्र राहुल गांधींचा हा आरोप फेटाळून लावला. सभागृहाचा वेळ वाया घालविण्यापेक्षा नॅशनल हेरॉल्ड मुद्यावर सरकार आणि पीएमओविरुद्धच्या आरोपाबाबतचे पुरावे सादर करा, असे आव्हान सरकारने दिले.
न्यायपालिकेला धमकावण्यासाठी काँग्रेस संसदेचा वापर करीत असल्याचा आरोप फेटाळून लावताना राहुल गांधी म्हणाले, ‘हा शंभर टक्के राजकीय सूड आहे. पीएमओकडून घेण्यात येत असलेला शंभर टक्के सूड आहे. माझा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. शेवटी काय निर्णय लागतो हे आम्ही बघू. सत्य समोर येईल.’ काँग्रेस न्यायपालिकेला धमकावण्यासाठी संसदेचा वापर करीत असल्याचा आरोप सांसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केला आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता राहुल गांधी म्हणाले, न्यायपालिकेला कोण धमकावत आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे.
रणकंदन सुरूच
नॅशनल हेरॉल्डप्रकरणी न्यायालयाने काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविलेल्या समन्सवरून संसदेत निर्माण झालेला संघर्ष दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. काँग्रेसशी तृणमूल काँग्रेसने लोकसभेत हातमिळविणी केल्याचे चित्र बुधवारी बघायला मिळाले.