शेकडाे ट्रॅक्टर्ससह शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 01:19 AM2021-01-17T01:19:40+5:302021-01-17T07:13:21+5:30
या परेडची ड्राय रनही शेतकऱ्यांनी घेतली आहे. ‘निहंग’ समुदायातील सदस्यांनी सिंघू सीमेवर घाेड्यांवरून सुमारे १५ किलाेमीटरपर्यंत मार्च काढला. कृषी कायद्याच्या विराेधात शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकारसाेबत चर्चेची नववी फेरीही निष्फळ झाली.
नवी दिल्ली : कृषी कायद्याविराेधात आंदाेलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ‘ट्रॅक्टर परेड’साठी कंबर कसली आहे. लाखाे शेतकरी या निषेध रॅलीमध्ये सहभागी हाेणार असून त्यात हरयाणातील शेतकऱ्यांचा माेठा सहभाग राहणार आहे. त्यामुळे काेंडी टाळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आतापासून दिल्लीच्या दिशेने कूच केले आहे.
या परेडची ड्राय रनही शेतकऱ्यांनी घेतली आहे. ‘निहंग’ समुदायातील सदस्यांनी सिंघू सीमेवर घाेड्यांवरून सुमारे १५ किलाेमीटरपर्यंत मार्च काढला. कृषी कायद्याच्या विराेधात शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकारसाेबत चर्चेची नववी फेरीही निष्फळ झाली. आता शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाला पुकारलेल्या ट्रॅक्टर परेडची जंगी तयारी सुरू केली आहे. हरयाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांचा आंदाेलनामध्ये सर्वाधिक सहभाग आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर माेठ्या संख्येने ट्रॅक्टर्स आणि शेतकरी दाखल हाेत आहेत. हरयाणातील सुमारे ७ हजार गावांमधून अनेक वाहने धाडली आहेत.
केवळ हरयाणातूनच १ लाख ट्रॅक्टर्स सहभागी -
हाेण्याचा अंदाज आहे. दरराेज ३०० ट्रॅक्टर ट्राॅली आणि प्रत्येक ट्राॅलीमध्ये १०० ते १५० असे हजारो शेतकरी सिंघू सीमेवर दाखल हाेत आहेत. त्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या वाहनांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे.
- हरयाणातून माेठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना हाेत आहेत. त्यामुळे गर्दी आणि वाहतुकीची काेंडी वाढली आहे. याकडे पाेलिसांचे लक्ष असून गरज पडल्यास निर्णय घेऊ, असे पाेलिसांनी सांगितले.
- सिंघू सीमेवरून टीकरी तसेच इतर सीमांवर निहंग समुदायातील ५० घाेडेस्वारांनी रॅली काढली. ट्रॅक्टर परेडसाठी ही एक प्रकारे ड्राय रन हाेती. शेतकरी २६ जानेवारीला ट्रॅक्टरमधून रॅली काढतील. तर आम्ही त्यांच्यासाेबत घाेड्यांवरून सहभागी हाेऊ, असे या समुदायातील सदस्यांनी सांगितले.