७ राज्यांच्या राजधानीत पेट्राेल शंभरीपार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 06:14 AM2021-06-27T06:14:06+5:302021-06-27T06:14:18+5:30
महागाईच्या झळा : पेट्राेल, डिझेलची महिन्यातील १४वी दरवाढ
मुंबई : पेट्राेल आणि डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरूच आहे. तेल कंपन्यांनी पेट्राेल आणि डिझेलची ३५ पैसे दरवाढ केली आहे. या महिन्यात १४ वेळा इंधन दरवाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतर सात राज्यांची राजधानी असलेल्या शहरांमध्ये पेट्राेलने शंभरी पार केली आहे. उच्चांकी दरांमुळे त्रस्त झालेल्या जनतेला मोदी सरकारकडून दिलासा मिळू शकतो. सरकारकडून पेट्राेल, डिझेलवर करकपातीची शक्यता आहे.
मुंबई पेट्राेलचे दर १०४.२२ रुपये प्रति लीटर झाले. डिझेलही ९६.१६ रुपये प्रति लीटरवर पाेहाेचले. देशाची राजधानी दिल्लीत पेट्राेलची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. दिल्लीत पेट्राेल ९८.११ रुपये तर डिझेलचे दर ८८.६५ रुपये प्रति लीटर झाले आहेत. चेन्नईही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. चेन्नईत पेट्राेल ९९.१९ रुपये, तर डिझेल ९३.२३ रुपये प्रति लीटरवर पाेहाेचले. काेलकाता येथे पेट्राेल ९७.९७, बंगळुरू येथे १०१.३९ आणि जयपूर येथे १०४.८१ रुपये प्रति लीटर झाले. पेट्राेलची शंभरी असलेल्या राजधानी असलेल्या शहरांमध्ये बिहारच्या पाटणा आणि केरळच्या तिरुवनंतपुरमचा समावेश झाला आहे.