ओडिसा आणि आंध्र प्रदेशात धडकणार 'गुलाब' चक्रीवादळ, मुसळधार पावसासह भूस्खलनाचा अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 10:25 AM2021-09-26T10:25:21+5:302021-09-26T10:31:19+5:30
Cyclone Gulab: चक्रीवादळामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिसा किनारपट्टीवर 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विशाखापट्टनम: आज आज ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात 'गुलाब' चक्रीवादळ धडकणार आहे. भारतीय हवामान विभागा (IMD) च्या मते, हे चक्रीवादळ रविवारी सायंकाळी आंध्र प्रदेशातील गोपालपूर आणि कलिंगपट्टणममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं सांगितल्यानुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या खोल दाबाच्या पट्ट्याचे शनिवारी 'गुलाब' चक्रीवादळात रुपांतर झाले. या चक्रीवादळामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनीही चक्रीवादळाचा इशारा आणि हवामान खात्याचा अहवाल लक्षात घेऊन आढावा बैठक घेतली. यात त्यांनी अधिकाऱ्यांना सर्व आवश्यक पऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. चक्रीवादळासाठी आंध्रात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच, आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना श्रीकाकुलम आणि विशाखापट्टणम जिल्ह्यात तैनात करण्यात आलं आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात २७-२९ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता
सध्या गुलाब चक्रीवादळ कुठं आहे ?
IMD ने दिलेलया माहितीनुसार, पाकिस्तानने या चक्रीवादळाला 'गुलाब' नाव दिलं आहे. हे चक्रीवादळ सध्या ओडिशामधील गोपालपूरपासून 370 किमी दक्षिणपूर्व आणि आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणमपासून 440 किमी पूर्वेला होतं. हे गेल्या सहा तासात 7 किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, हे वादळ पश्चिमेकडे सरकण्याची आणि आज कलिंगपट्टणम आणि गोपालपूर दरम्यान उत्तर आंध्र प्रदेश-दक्षिण ओडिशा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
महापात्रा पुढं म्हणाले की, वादळामुळे वाऱ्याचा वेगही वेगवान असेल. 75 किमी प्रति तास ते 95 किमी प्रतितास वेग असू शकतो. वादळामुळे मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो, ज्यामुळे अनेक सखल जिल्ह्यांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या दक्षिण भागातील डोंगराळ भागात अचानक पूर येण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे गंजम आणि पुरी शहरी भाग जलमय होऊ शकतात.
सात जिल्ह्यात मदत पथके तैनात
विशेष मदत आयुक्त (एनआरसी) पीके जेना यांनी चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन ओडिशा आपत्ती जलद कृती दलाच्या (ओडीआरएएफ) 42 पथकं आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) 24 पथकांसह 102 अग्निशमन दलांना तैनात केलं आहे. गजपती, गंजम, रायगड, कोरापुट, मलकनगिरी, नबरंगपूर आणि कंधमाल अशा सात जिल्ह्यांमध्ये टीम पाठवण्यात आल्या आहे.