चक्रीवादळ हुडहुड आंध्र, ओडिशाकडे
By admin | Published: October 9, 2014 03:23 AM2014-10-09T03:23:43+5:302014-10-09T03:23:43+5:30
अंदमान समुद्र व त्याच्या जवळपास असलेल्या दबावामुळे बुधवारी हुडहुड हे चक्रीवादळ गतिमान होऊन ते १२ आॅक्टोबरपर्यंत आंध्र व ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भुवनेश्वर : अंदमान समुद्र व त्याच्या जवळपास असलेल्या दबावामुळे बुधवारी हुडहुड हे चक्रीवादळ गतिमान होऊन ते १२ आॅक्टोबरपर्यंत आंध्र व ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या संबंधीच्या स्थितीचा आढावा घेऊन, गेल्या वर्षी फॅलिन या चक्रीवादळासोबत दोन हात करण्यासाठी जी तयारी केली होती ती या वर्षीही सज्ज असल्याचे म्हटले आहे. भारतीय हवामान खात्याच्या ताज्या निवेदनानुसार, हुडहुड हे चक्रीवादळ गोपालपूरपासून दक्षिणपूर्व दिशेला दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीत ११५० कि.मी. अंतरावर सकाळी ८.३० च्या सुमारास केंद्रित झाले होते. ते आता अंदमान निकोबार बेटांजवळून सरकत असून ते पश्चिम-उत्तर पश्चिम दिशेकडे जात आहे. येत्या २४ तासात ते रौद्र रूप धारण करेल असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार ते १२ आॅक्टोबरच्या दुपारपर्यंत विशाखापट्टणम, गोपालपूर दरम्यानच्या किनारपट्टीवरून पुढे सरकेल. यामुळे येत्या २४ तासात ओडिशात एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
(वृत्तसंस्था)