निवार चक्रीवादळ बनले रौद्र, एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 04:16 AM2020-11-26T04:16:49+5:302020-11-26T04:17:24+5:30
तामिळनाडू, पुडुचेरीतील अनेक भागांत वेगवान वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस, एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले
बुधवारी मध्यरात्री किंवा पहाटे धडकणार
चेन्नई/पुडुचेरी : तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या किनारपट्टीच्या दिशेने घोंगावत निघालेल्या ‘निवार’ चक्रीवादळाने रौद्ररूप धारण केले असून, वेगवान वाऱ्यासोबत बुधवारी तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपले. अनेक भाग जलमय झाले असून, हे चक्रीवादळ बुधवारी मध्यरात्री किंवा पहाटे तामिळनाडू आणि पुडुचेरी किनारपट्टीदरम्यान धडकणार असल्याने किनारपट्टीलगतच्या भागातील एक लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. हे चक्रीवादळ दक्षिण किनारपट्टीवर धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले. निवार चक्रीवादळ सध्या कुड्डलोरच्या आग्नेयेला ५० किलोमीटर आणि पुडुचेरीच्या आग्नेयेला ४० किलोमीटरवर आहे.
चक्रीवादळाचे केंद्र पुढील तीन तासांच्या आत पुडुचेरीनजीकची किनारपट्टी ओलांडेल. अनेक भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी तामिळनाडू आणि पुडुचेरी प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने बुधवारी रात्री साडेअकरा वाजता जारी केलेल्या पत्रकानुसार ताशी १२०-१३० ते १४५ किलोमीटर वाऱ्याच्या वेगाने वादळ बुधवारी मध्यरात्री आणि २६ नोव्हेंबरच्या पहाटे पुडुचेरी कराईकल आणि ममल्लापुरम दरम्यानची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. चेन्नईसह वेल्लोर, कुड्डलोर, विल्लुपुरम, नागपट्टीणम, तिरुवरूर, चेंगलपेट, कांचीपुरम, तंजावर, तिरुवन्नामलाई, अरियालूर व पेराम्बुलूर येथे २६ नोव्हेंबर रोजी सुटी, शाळा-महाविद्यालयांना शनिवारपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे.