दक्षिण भारताला चक्रीवादळाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:58 AM2017-12-01T01:58:38+5:302017-12-01T01:59:35+5:30
दक्षिण श्रीलंकेजवळ बुधवारी सकाळी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर ओक्खी चक्रीवादळात झाले असून, त्याचा श्रीलंका, लक्षद्वीप समूहाला धोका निर्माण झाला आहे़ दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडू, निकोबार द्वीपसमूह येथे जोरदार वृष्टी सुरू आहे. केरळ व तामिळनाडूतील शाळांना सुटी देण्यात आली आहे.
कोलंबो/ नवी दिल्ली : दक्षिण श्रीलंकेजवळ बुधवारी सकाळी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर ओक्खी चक्रीवादळात झाले असून, त्याचा श्रीलंका, लक्षद्वीप समूहाला धोका निर्माण झाला आहे़ दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडू, निकोबार द्वीपसमूह येथे जोरदार वृष्टी सुरू आहे. केरळ व तामिळनाडूतील शाळांना सुटी देण्यात आली आहे.
हे चक्रीवादळ कन्याकुमारीपासून १७० किलोमीटर, निकोबार बेटापासून ६०० किलोमीटर दूर आहे़ हे चक्रीवादळ येत्या १२ तासांत पश्चिम उत्तरेच्या दिशेने श्रीलंकेकडे सरकण्याची शक्यता आहे़ हे चक्रीवादळ जमिनीकडे येत जाईल तसतशी त्याची तीव्रता वाढत जाण्याची शक्यता आहे़ दक्षिण केरळ, तामिळनाडू परिसरात पुढील २४ तास ताशी ५५ ते ६५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे़
मोठे नुकसान अपेक्षित
चक्रीवादळ, पाऊस व वेगाने वाहणारे वारे यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ घरे, रस्ते तसेच विद्युत तारा तसेच झाडे पडून नुकसान होण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे़