हृदयद्रावक ! खेळता-खेळता बसला फास, लहानग्याने गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 03:45 PM2017-09-22T15:45:26+5:302017-09-22T15:47:46+5:30
गुरूवारी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास तो शिकवणीवरून घरी परतला. त्यावेळी त्याची आई आणि दोन्ही बहिणी घराच्या दुस-या मजल्यावर होत्या आणि तो तळमजल्यावर खेळत होता.
दिल्ली - सातवीच्या एका विद्यार्थ्याचा गळ्याला फास बसल्याने मृत्यू झाल्याची मन हेलवणारी घटना घडली आहे. मृत्यूमुखी पडलेला लहानगा घरात खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील चौकशी करत आहेत.
राजधानी दिल्लीच्या नंदनगरी परिसरातील ही घटना आहे. मिठाईचं दुकान असलेले पुरूषोत्तम आपली पत्नी,मुलगा आणि दोन मुलींसह राहतात. त्यांचा 14 वर्षांचा मुलगा सातवीतला विद्यार्थी होता.
गुरूवारी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास तो शिकवणीवरून घरी परतला. त्यावेळी त्याची आई आणि दोन्ही बहिणी घराच्या दुस-या मजल्यावर होत्या आणि तो तळमजल्यावर खेळत होता. थोड्यावेळानंतर आई आणि बहिणी खाली आल्या आणि त्यांना जबर धक्का बसला. मुलगा फासावर लटकल्याचं पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्याजवळ एक स्टूल पडला होता. 'आज तक'ने याबाबत वृत्त दिलं आहे.
घरात खेळत-खेळता तो स्टूलवर उभा राहिला आणि पंख्याच्या पात्यांवर त्याने ओढणी टाकली. त्या दरम्यानच त्याला फास बसला आणि पायाखालचा स्टूल सटकला अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपवला आहे. मात्र, पोलीस अजूनही या घटनेची चौकशी करत आहेत.