हुरियत नेत्यांची केंद्र सरकारशी चर्चेची तयारी, काश्मीरमधील स्थिती सुधारल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 04:45 AM2019-06-24T04:45:03+5:302019-06-24T04:45:43+5:30

काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियत नेत्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे

 Hurriyat leaders claim to be ready for talks with the central government, improve the situation in Kashmir | हुरियत नेत्यांची केंद्र सरकारशी चर्चेची तयारी, काश्मीरमधील स्थिती सुधारल्याचा दावा

हुरियत नेत्यांची केंद्र सरकारशी चर्चेची तयारी, काश्मीरमधील स्थिती सुधारल्याचा दावा

Next

श्रीनगर : काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियत नेत्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शनिवारी दिली.
दूरदर्शनने आयोजिलेल्या एका समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे दोन मंत्री व्यासपीठावर उपस्थित होते. सत्यपाल मलिक म्हणाले की, मी काश्मीरचा राज्यपाल म्हणून सूत्रे स्वीकारली त्यावेळी असलेल्या परिस्थितीत आता खूपच सुधारणा झाली आहे. हुरियत नेत्यांनी चर्चेस तयार व्हावे, असे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी याआधी आवाहन केले होते; पण त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता. आता आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे हुरियत नेते किमान बोलून तरी दाखवत आहेत.
चर्चेसाठी तयार असल्याचे वक्तव्य हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवाईज उमर फारुक यांनी एका मुलाखतीत केले होते. ते म्हणाले होते की, मोदी सरकारने काश्मीरमधील थांबलेली राजकीय प्रक्रिया पुन्हा प्रवाही केली पाहिजे. 

राज्यात सुरू असलेला हिंसाचार थांबविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. या दिशेने सरकारने योग्य पावले उचलल्यास त्याला आम्ही नक्की सहकार्य करू. अशाच प्रकारचे आवाहन मिरवाईज उमर फारुक यांनी श्रीनगरमधील जामा मशिदीमध्ये स्थानिक नागरिकांसमोर केलेल्या भाषणात म्हटले होते की, काश्मीरचा प्रश्न संघर्ष किंवा लष्करी बळाचा वापर करून नव्हे, तर चर्चेच्या माध्यमातूनच सोडविला जाऊ शकतो.
दगडफेकीच्या प्रकारांत झाली घट
केंद्र सरकारशी चर्चेची तयारी दर्शविणारे मिरवाईज उमर फारुक यांना हे सध्या स्थानबद्धतेत आहेत. काश्मीर विद्यापीठातील पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहाण्यास मिरवाईज यांना शनिवारी मनाई करण्यात आली. काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांत सामील होणाऱ्या युवकांच्या संख्येत, तसेच शुक्रवारी नमाज पठणानंतर स्थानिक नागरिकांकडून सुरक्षा दलांवर केल्या जाणाºया दगडफेकीच्या प्रकारात घट झाली आहे. दहशतवादाकडे वळलेल्या युवकांना त्या मार्गापासून परावृत्त करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे राज्यपाल मलिक म्हणाले.

Web Title:  Hurriyat leaders claim to be ready for talks with the central government, improve the situation in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.