पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 05:52 AM2024-11-06T05:52:32+5:302024-11-06T05:53:02+5:30
Relationship News: गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारात पती-पत्नीच्या गोपनीयतेचा समावेश होतो. कायदा जोडीदारांना एकमेकांची हेरगिरी करण्यास प्रोत्साहित करू शकत नाही. जोडीदाराच्या गोपनीयतेचे उल्लंघन करून मिळवलेले पुरावे न्यायालयात ग्राह्य नसल्याचे मद्रास आणि हिमाचल हायकोर्टाने म्हटले आहे.
- डॉ. खुशालचंद बाहेती
चेन्नई - गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारात पती-पत्नीच्या गोपनीयतेचा समावेश होतो. कायदा जोडीदारांना एकमेकांची हेरगिरी करण्यास प्रोत्साहित करू शकत नाही. जोडीदाराच्या गोपनीयतेचे उल्लंघन करून मिळवलेले पुरावे न्यायालयात ग्राह्य नसल्याचे मद्रास आणि हिमाचल हायकोर्टाने म्हटले आहे.
पतीने पत्नीची क्रूरता आणि व्यभिचार या कारणावरून घटस्फोट मागितला. यात पत्नीच्या मोबाइलचा कॉल डेटा रेकॉर्ड पुरावा म्हणून सादर केला. पत्नीने यास आक्षेप घेतला. कौटुंबिक न्यायालय कायद्याच्या कलम १४ नुसार विवाद प्रभावीपणे निकाली काढण्यास मदत होईल असा कोणताही अहवाल, जबाब, दस्तऐवज, माहिती पुरावा म्हणून स्वीकारता येऊ शकतो, या आधारे न्यायालयाने पत्नीचा अर्ज फेटाळला. याला पत्नीने मद्रास हायकोर्टात आव्हान दिले.
हायकोर्ट म्हणाले की, पतीने पत्नीची कॉल हिस्ट्री गुप्तपणे मिळवली. यामुळे पत्नीच्या गोपनीयतेचा भंग झाला. कायदा जोडीदारांना एकमेकांची हेरगिरी करण्यास परवानगी देऊ शकत नाही किंवा प्रोत्साहित करू शकत नाही. गोपनीयतेच्या मूलभूत भूत अधिकारात पती-पत्नीच्या गोपनीयतेचाही समावेश होतो. याचे उल्लंघन करून मिळालेला पुरावा ग्राह्य नाही. पत्नीच्या संमतीशिवाय मिळालेल्या माहितीकडे सौम्यपणे पाहता येणार नाही.
विश्वास हा वैवाहिक संबंधांचा पाया
विश्वास हा वैवाहिक संबंधांचा पाया आहे. एकमेकांच्या हेरगिरीमुळे एआय फोटो वैवाहिक जीवनाची जडणघडण नष्ट होते. बायको डायरी ठेवू शकते. तिचे विचार आणि जिव्हाळ्याच्या भावना लिहू शकते. नवरा तिच्या संमतीशिवाय डायरी वाचणार नाही, अशी अपेक्षा करण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे. जे डायरीला लागू तेच मोबाइललाही लागू होईल. - न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन