वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 08:51 AM2024-10-08T08:51:55+5:302024-10-08T08:54:34+5:30
उत्तर प्रदेशमध्ये एक कौतुकास्पद घटना घडली आहे. पती-पत्नी एकत्र आयपीएस अधिकारी बनले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये एक कौतुकास्पद घटना घडली आहे. पती-पत्नी एकत्र आयपीएस अधिकारी बनले आहेत. योगी सरकारने २४ पीपीएस अधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं आहे. प्रमोशन मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये एका जोडप्याचाही समावेश आहे. पती-पत्नी एकाच सेवेत प्रमोशन घेऊन आयपीएस होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये प्रांतीय पोलीस सेवेतील पीपीएस कॅडरच्या २४ अधिकाऱ्यांचा आयपीएस होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी मुख्य सचिव, डीजीपी आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लवकरच आदेश जारी केला जाणार आहे.
बऱ्याच काळापासून प्रमोशनच्या प्रतीक्षेत असलेल्या पीपीएस अधिकाऱ्यांमध्ये बाराबंकीत एसपी सिटी म्हणून कार्यरत असलेले चिरंजीव नाथ सिन्हा आणि त्यांच्या पत्नी एडिशनल एसपी रश्मी राणी यांचाही समावेश आहे. योगी सरकारने या दोन्ही अधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं आहे. आता दोघांचंही एकत्र प्रमोशन होऊन ते आयपीएस होणार आहेत.
१९९५-१९९६ बॅचच्या अधिकाऱ्यांची DPC बैठक झाली. प्रमोशन मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये बजरंग बळी, डॉ. दिनेश यादव, समीर सौरभ, मो. इरफान अन्सारी, अजय प्रताप, नेपाल सिंह, अनिल कुमार, कमलेश बहादूर, राकेश कुमार सिंग, लाल भरत कुमार पाल, रश्मी राणी, अनिल कुमार यादव, संजय कुमार, शैलेंद्र कुमार श्रीवास्तव, लक्ष्मी निवास मिश्रा, राजेश कुमार श्रीवास्तव, चिरंजीव नाथ सिन्हा, डॉ. विश्वजीत श्रीवास्तव, मनोज कुमार अवस्थी, अमृता मिश्रा, रोहित मिश्रा, शिवराम यादव, अशोक कुमार आणि दीपेंद्र नाथ चौधरी यांचा समावेश आहे.