पत्नीसोबत पहिली होळी खेळण्यासाठी सासरी आला अन् जीव गमावला; 13 दिवसांपूर्वीच झालेलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 10:19 AM2023-03-08T10:19:37+5:302023-03-08T10:24:11+5:30
नवविवाहित महिलेने पतीसोबत पहिल्यांदा होळी साजरा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण नियतीला ते काही मान्य नव्हते.
राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील हिंडौन शहर पोलीस स्टेशन परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या 13 दिवसांतच पत्नीसोबत पहिल्यांदा होळी खेळायला गेलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. नवविवाहित महिलेने पतीसोबत पहिल्यांदा होळी साजरा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण नियतीला ते काही मान्य नव्हते. या भीषण अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नवविवाहित तरुणांशिवाय काका-पुतण्यांचाही समावेश आहे. होळीपूर्वीच अपघातात आपल्या प्रियजनांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांना धक्का बसला आहे.
हिंडौन शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवान बाईकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात काका-पुतण्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही बाईकचा चक्काचूर झाला. यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणांपैकी एकाचे 13 दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. हिंडौन शहराचे नवीन मंडी पोलीस स्टेशन, नीरज शर्मा यांनी सांगितले की, बालाघाट भागातील फौजीपुरा येथील रहिवासी महेंद्र जाटव यांचा मुलगा नत्तीराम जाटव आणि त्यांचा पुतण्या राहुल जाटव (17) मुलगा मुकेश जाटव हे सोमवारी संध्याकाळी सुरौथला जात होते. तर पिंटू गुर्जर हा आपल्या सासरी जात होता. हिंडौन शहरातील बयाना रोडवरील एकोरासी वळणावर संध्याकाळी 7.30 च्या सुमारास दोन्ही बाईकची धडक झाली.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बाईकची धडक इतकी भीषण होती की पिंटू आणि राहुल यांचा जागीच मृत्यू झाला, तर महेंद्र जाटव गंभीर जखमी झाले. सुरथ पोलीस स्टेशन जखमी महेंद्र आणि दोन्ही तरुणांचे मृतदेह घेऊन हिंडौन रुग्णालयात पोहोचले, तेथून महेंद्रला प्राथमिक उपचारानंतर जयपूरला रेफर करण्यात आले. जयपूरमध्ये उपचारादरम्यान महेंद्रचा मृत्यू झाला. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून मृतांची ओळख पटवून नातेवाईकांना माहिती दिली.
रस्ता अपघातात जीव गमावलेल्या राहुल जाटवचे वडील मुकेश जाटव यांचे पाच वर्षांपूर्वी सिलिकोसिसने निधन झाले. तेव्हापासून काका महेंद्र जाटव मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आता काका-पुतण्यांचाही रस्ता अपघातात मृत्यू झाला. राहुल कॉलेजमध्ये शिकत होता. दुसरीकडे, कारवाडी गावात राहणाऱ्या पिंटू गुर्जरचे 22 फेब्रुवारीलाच लग्न झाले होते. त्याची पत्नी पिहार कांद्रोली येथे होती, त्यामुळे तो तिच्यासोबत होळी खेळण्यासाठी सासरच्या घरी जात होता, मात्र वाटेत रस्त्याच्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. पिंटूच्या मृत्यूचे वृत्त समजताच त्याच्या सासरच्या घरी आणि गावात शोककळा पसरली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"