गर्भ पाडण्यास वडिलांचा मुलीवर दबाव, नकार दिल्यानं डोळ्यांदेखत पतीची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 01:57 PM2018-09-16T13:57:11+5:302018-09-16T14:14:16+5:30
माणुसकीला काळीमा फासणारी आणि मन हादरवणारी घटना तेलंगणामध्ये घडली आहे. गरोदर महिलेसमोरच तिच्या पतीची हत्या करण्यात आली.
नवी दिल्ली - माणुसकीला काळीमा फासणारी आणि मन हादरवणारी घटना तेलंगणामध्ये घडली आहे. समाजातील आपला मान कायम राहावा, यासाठी एका पित्यानं आपल्या भावासोबत मिळून स्वतःच्याच मुलीच्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. कुऱ्हाडीनं वार करुन प्रणय कुमार (वय 23 वर्ष)ची निर्घृण हत्या करण्यात आली. वडील-काकाने मिळून पतीची हत्या केली, असा आरोप प्रणयची पत्नी अमृता वार्षिणीने केला आहे. दरम्यान, या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी मिरयालगुडा परिसरात बंद पुकारण्यात आला आहे.
या कारणासाठी केली प्रणय कुमारची हत्या
प्रणय आणि अमृता वार्षिणी (वय 21 वर्ष) या दोघांनी आंतरजातीय विवाह केला. प्रणय हा खालच्या जातीतील मुलगा असल्यानं अमृताच्या कुटुंबीयांच्या त्यांच्या लग्नाला विरोध होता. मात्र, या दोघांनीही कुटुंबीयांचा विरोध झुगारुन आपला संसार थाटला. या लग्नामुळे अमृताचे कुटुंबीय प्रचंड नाराज झाले होते. मुलीनं आपल्या मनाविरोधात लग्न केल्याचा राग त्यांच्या मनात होता.
यादरम्यान, अमृता गरोदर असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना समजली. तिनं मुलाला जन्म देऊ नये, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. मात्र तिनं वडील आणि काकाचा दबाव झुगारुन मुल वाढवण्यावर अमृता ठाम होती. आधीच आंतरजातीय विवाह केल्याचा राग अमृताच्या कुटुंबीयांच्या मनात होताच, त्यात प्रणयपासून तिला दिवस गेले होते. या सगळ्याचा राग काढण्यासाठी अमृताच्या कुटुंबीयांनी प्रणयलाच संपवण्याचा कट रचला.
नियमित तपासणीकरिता प्रणय अमृताला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला होता. काम आटोपल्यावर दोघंही हॉस्पिटलमधून बाहेर आले, त्यावेळेस मागील बाजूनं प्रणयवर कुऱ्हाडीनं सपासप वार करण्यात आले. एका मागून एक वार करण्यात आल्यानं प्रणयचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.
आपल्या डोळ्यांदेखत झालेली पतीची हत्या पाहून अमृता बेशुद्धच पडली. तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शुद्ध आल्यानंतर तिनं वडील आणि काकानं मिळून पतीची हत्या केल्याचा आरोप केला. तिनं केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.