नवऱ्याने जमीन विकून बायकोला शिक्षणासाठी कॅनडाला पाठवलं; पण तिने दुसरं लग्न केलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 12:43 PM2024-02-07T12:43:47+5:302024-02-07T12:48:04+5:30
हरमिंदर सिंहने सांगितलं की, 12 वर्षांपूर्वी बटाला जिल्ह्यातील एका गावातील मुलीशी त्याचं लग्न झालं होतं. दोघांनी एकत्र शिक्षण घेतलं आणि घरच्यांच्या संमतीनं दोघांचं लग्न ठरलं.
भारतात लग्न करून परदेशात गेलेल्या मुली अनेकदा तिथे जाऊन पुन्हा लग्न करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पंजाबमधील बटालाजवळील पेरेशाह गावात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. येथे राहणाऱ्या हरमिंदर सिंहची पत्नी चांगल्या भविष्याच्या आशेने कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेली होती. मात्र यानंतर तिने पतीला तेथे बोलावले नाही.या संदर्भात कुटुंबीयांच्या वतीने एसएसपी कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
या प्रकरणाची माहिती देताना हरमिंदर सिंहने सांगितलं की, 12 वर्षांपूर्वी बटाला जिल्ह्यातील एका गावातील मुलीशी त्याचं लग्न झालं होतं. दोघांनी एकत्र शिक्षण घेतलं आणि घरच्यांच्या संमतीनं दोघांचं लग्न ठरलं. लग्नानंतर सुमारे तीन महिन्यांनी पत्नी कॅनडाला गेली. पतीने सांगितले की, दोघांनीही चांगल्या भविष्याचं स्वप्न पाहिलं आणि त्याने पत्नीला कॅनडाला शिक्षणासाठी पाठवलं. यावेळी त्याने पत्नीची कॉलेजची फीही भरली. त्यासाठी वडिलोपार्जित जमीनही विकली.
पत्नी एक वर्षानंतर पंजाबमध्ये आली होती. मात्र नंतर ती पुन्हा कॅनडाला गेली. आता कॅनडामध्ये राहणाऱ्या तिच्या मित्रमैत्रिणींनी माहिती दिली आहे की त्याच्या पत्नीचं कॅनडामध्ये दुसरं लग्न झालं आहे. त्याने पत्नीशी संपर्क साधला असता तिने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पतीसह कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. आता त्याच्या पत्नीने त्याचे सर्व फोन नंबर ब्लॉक केले आहेत.
तरुणाची आई सुरजित कौर यांनी सांगितलं की, 12 वर्षांपासून कॅनडाला जाण्याच्या आशेवर असलेल्या आपल्या मुलाची मोठी फसवणूक झाली, ज्यामुळे त्याचं मन खूप दुखावलं आहे. तक्रार दाखल केली असून न्यायासाठी पोलिसांकडे दाद मागितली आहे. त्याचवेळी, पोलिसांनी हरमिंदर सिंहला या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय दिला जाईल, असं आश्वासन दिलं आहे.