uttarakhand glacier burst : महापुरात वाहून गेलाय पती, 3 महिन्याच्या चिमुकल्यासह वाट पाहतेय आई
By महेश गलांडे | Published: February 11, 2021 09:42 AM2021-02-11T09:42:00+5:302021-02-11T09:43:01+5:30
uttarakhand glacier burst : उत्तराखंडच्या ऋषिगंगा नदीमध्ये आलेला प्रलय हा नंदा देवी हिमकडा कोसळल्यामुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, आंतरराष्ट्रीय भूगर्भ वैज्ञानिक आणि हिमकड्यांच्या तज्ज्ञांनी दुर्घटना हिमकडा तुटल्याने नाही तर भूस्खलन झाल्याने घडल्याचा दावा केला आहे.
चामोली - उत्तराखंडमधील महापुरातील दुर्घटनेमुळे देश हळहळला, संसद सभागृहातही गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडमधील घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची माहिती दिली. या दुर्घटनेत चामोलीतील एक कंपनीच वाहून गेली असून 200 पेक्षा जास्त कामगार बेपत्ता आहेत. एनडीआरएफ जवानांसह वायू दलाचे जवानही सध्या येथील शोधमोहिमेत शर्थीचे प्रयत्न करत आहेत. येथील राणी गावाचा संपर्कच देशाशी तुटला आहे. त्यामुळे, एका नवजात शिशूला जन्म देणारी आई आपल्या बाळासह त्याच्या वडिलांच्या बेपत्ता होण्यामुळे काळजीत आहे.
उत्तराखंडच्या ऋषिगंगा नदीमध्ये आलेला प्रलय हा नंदा देवी हिमकडा कोसळल्यामुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, आंतरराष्ट्रीय भूगर्भ वैज्ञानिक आणि हिमकड्यांच्या तज्ज्ञांनी दुर्घटना हिमकडा तुटल्याने नाही तर भूस्खलन झाल्याने घडल्याचा दावा केला आहे. रविवारी आलेल्या महापुरानंतर रैनी गावातील पुष्पा नामक महिलेचा पती बेपत्ता आहे, त्यामुळे ती अतिशय चिंताग्रस्त आहे. रैनीसह एकूण 12 गावांचा संपर्क या महापुराच्या भीषण दुर्घटनेमुळे तुटला आहे. गावाला जोडणारा पूलही या महापुरात वाहून गेलाय. त्यावेळी, पुष्पा यांचे पती यशपाल सिंह हे त्यांच्या कामावर कार्यरत होते. यशपाल सिंह हे नदीपासूनच जवळच्या ठिकाणीच काम करत होते. त्यामुळे, आपल्या पतीच्या आणि 3 महिन्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाच्या काळजीनं पुष्पा यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
माझ्या तीन महिन्यांच्या बाळाच्या भविष्याचं काय? या काळजीत पुष्पा गेल्या दोन दिवसांपासून रडत आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये पुष्पा यांचं यशपालसोबत लग्न झालं होतं. तर, तीन महिन्यांपूर्वच पुष्पाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सध्या गावांचा संपर्क तुटल्यामुळे पुष्पासह त्यांच्या शेजारील कुटुंबांकडेही खायला अन्न नाही, घराती अन्नाचा साठा संपत आला आहे.
In Uttarakhand village disconnected due to flash floods, woman with newborn waits for her missing husband
— ANI Digital (@ani_digital) February 11, 2021
Read @ANI Story | https://t.co/I47X0ejlsFpic.twitter.com/zpHS2819Ri
उत्तराखंडमध्ये विविध सुरक्षा संस्थेचे जवान गेल्या चार दिवसांपासून बचाव कार्य करीत आहेत. तपोवन बोगद्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि दूरसंवेदी उपकरणांचा वापर केला जात आहे. या बोगद्यात हजारो टन चिखल मातीच्या गाळाचे ढिगारे साचले आहेत. आतापर्यंत ३४ मृतदेह सापडले असून, अन्य १७० जण बेपत्ता आहेत. बोगद्यात अडकलेल्या लोकांचा बचाव करण्यासाठी अद्ययावत उपकरणांसह उपलब्ध साधनांचा वापर केला जात आहे, असे उत्तराखंड पोलीसचे मुख्य प्रवक्ते आणि उपमहानिरीक्षक नीलेश आनंद भरणे यांनी घटनास्थळी सांगितले.