पत्नीचं व्हॉट्सअॅप चेक करणं पतीला पडलं महागात
By admin | Published: June 12, 2017 11:13 AM2017-06-12T11:13:09+5:302017-06-12T11:16:27+5:30
पत्नीचे व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉल लिस्ट बघणं पतीच्या चांगलंच अंगलट आलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
आग्रा. दि. 12- पत्नीचे व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉल लिस्ट बघणं पतीच्या चांगलंच अंगलट आलं आहे. पत्नीचे परपुरूषाशी संबंध असल्याच्या संशयावरून पतीने तिचे व्हॉट्सअॅप चॅट आणि कॉल रेकॉर्ड तपासण्यासाठी मोबाईल हातात घेतला, पण ते त्याला भलतंच महागात पडलं आहे. कारण पतीने मोबाईल घेतल्यामुळे संतापलेल्या पत्नीने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पती बेशुद्ध झाला. नेत्रपाल असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. खेरागडमधील भिलवाडी गावात ही घटना घडली आहे. नेत्रपालवर हल्ला केल्यानंतर नीतूने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण नेत्रपालच्या घरच्यांनी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मात्र मी निर्दोष असून नेत्रपालने स्वत:वर हल्ला करत मला फसवायचा प्रयत्न केला, असा दावा नीतूने केला आहे.
२०१४ मध्ये नेत्रपाल यांचं नीतू सिंह हिच्याशी लग्न झालं होतं. पण बऱ्याच काळापासून ते दोघं वेगळे राहत होते, नीतूचे दुसऱ्या पुरूषाशी प्रेमसंबंध आहेत, असा संशय नेत्रपाल यांना होता. गेल्या महिन्यात एका समारंभासाठी ती सासरी आली होती. "शनिवारी रात्री नीतू व्हॉट्सअॅपवरून चॅट करत असल्याचं पाहिल्यानंतर मला संशय आला आणि मी तिच्याकडे मोबाईल मागितला. पण तिने तो देण्यास नकार देत मला दूर राहण्यास सांगितलं. मी तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला पण तेवढ्यात तिने माझ्यावर हल्ला चढवला आणि मी बेशुद्ध पडलो," असं नेत्रपालने सांगितले.
नीतूचे दुसऱ्या जातीतील व्यक्तीशी संबंध आहेत, पण लग्नाच्यावेळी आम्हाला हे माहीती नव्हतं. आम्ही तिला विचार करायला सांगून नेत्रपालसोबत राहण्याचा सल्ला दिला होता. पण तिने आमचं काहीच ऐकलं नाही आणि त्या व्यक्तीसोबत संबंध कायम ठेवले", असं नेत्रपालच्या वडिलांनी सांगितलं आहे. याप्रकरणी मारहाण करणारी महिला सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सध्या सुरू आहे.