कडक सॅल्यूट! 1 लाख हुंड्यासाठी सासरच्यांनी घराबाहेर काढलं, सुनेने कष्टाने उभारला 60 लाखांचा व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 11:20 AM2022-03-29T11:20:34+5:302022-03-29T11:27:15+5:30
हुंड्यासाठी सुनेला घराबाहेर काढणाऱ्या सासरच्या मंडळींना सुनेने स्वत:च्या आपल्या मेहनतीच्या जोरावर चांगलाच धडा शिकवला आहे. तिने स्वत:च्या हिमतीवर 60 लाखांचा व्यवसाय उभा करून स्वत:ला सिद्ध केलं.
नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. हुंड्यासाठी सुनेला घराबाहेर काढणाऱ्या सासरच्या मंडळींना सुनेने आपल्या मेहनतीच्या जोरावर चांगलाच धडा शिकवला आहे. तिने स्वत:च्या हिमतीवर 60 लाखांचा व्यवसाय उभा करून स्वत:ला सिद्ध केलं आहे. झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्याच्या घाटशिलात राहणाऱ्या मधुमिता साव या महिलेला हुंड्यासाठी त्रास सहन करावा लागला. मात्र यातूनच ती थांबली नाही तर उभं राहिली.
स्वत:तर स्वावलंबी झालीच याशिवाय अन्य महिलांनाही स्वत:च्या पायावर उभं राहायला मदत केली. लग्नाच्या सहा महिन्यानंतर महिलेकडून एक लाखांचा हुंडा मागितला जात होता. 1 लाख दिले नाही म्हणून सासरच्या मंडळींनी तिला घराबाहेर काढलं. मात्र तरीही ती घाबरली नाही. तर घराबाहेर पडून स्वत:चा व्यवसाय उभा केला आणि आज कंपनी उभी केली असून 200 महिलांना रोजगार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाटशिला येथे राहणारी मधुमिता साव हिचं लग्न 2012 मध्ये झालं होतं. मात्र सासरच्यांनी केलेल्या छळामुळे सहा महिन्याच्या आत ती सासरी सोडून घरी परतली.
कंपनीत 200 महिलांना रोजगार मिळाला
पहिल्यांदा तर मधुमिताला लोकांचे टोमणे ऐकावे लागले. पतीला सोडून घरी बसली म्हणून शेजारपाजारचे तिला ऐकवत होते. मात्र तरीही मधुमिताने हिंमत सोडली नाही. ती जमशेदपूरच्या एका फर्निचरच्या दुकानातून काम शिकत होती. पाच वर्षांपर्यंत फर्निचरच्या दुकानात काम केल्यानंतर तिने वूड क्राफ्टचं काम सुरू केलं. पीपल ट्री कंपनी नावाने 2016 मध्ये तिने रजिस्ट्रेशन केलं. सुरुवातील फार महिला नव्हत्या, मात्र आज पीपल ट्री कंपनीत 200 महिलांना रोजगार मिळाला आहे.
पीपल ट्री कंपनीचं वार्षिक उत्पन्न 60 लाखांपर्यंत
सद्यपरिस्थितीत मधुमिता सांगते की, तिचे सध्या 9 दुकानं आहेत. पीपल ट्री कंपनीचं वार्षिक उत्पन्न 60 लाखांपर्यंत आहे. सध्या ती करीत असलेल्या कामाचा अभिमान असल्याचं मधुमिता सांगते. वूड क्राफ्टच्या सामानाची किंमत ही 50 रुपये ते 5 हजार रुपयांपर्यंत आहे. आपल्या सोबत इतर महिलांना घेऊन त्यांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्याचा प्रचंड आनंद आहे. सध्या आपल्यासोबत तब्बल 200 महिला काम करत असल्याचं मधुमिताने सांगितलं आहे. मधुमिताच्या कामाचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.