पतीला पत्नीच्या प्रियकराचे कॉल डिटेल्स हवे होते, पत्नीने घेतली उच्च न्यायालयात धाव; मग पुढे...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 06:18 AM2022-12-15T06:18:28+5:302022-12-15T06:18:55+5:30
कौटुंबिक न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या कॉल डिटेल्सचा अहवाल काढण्याचे आदेश दिले होते. जोडप्याच्या वादात पतीने आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने कोणाच्या संमतीशिवाय कॉल डिटेल्स घेणे घटनाबाह्य ठरवले आहे. हे त्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. एका व्यक्तीच्या याचिकेवर हायकोर्टाने हा निर्णय दिला.
कौटुंबिक न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या कॉल डिटेल्सचा अहवाल काढण्याचे आदेश दिले होते. जोडप्याच्या वादात पतीने आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. हे सिद्ध करण्यासाठी पतीने पत्नीच्या प्रियकराचे कॉल डिटेल्स तपासा अशी विनंती केली होती. पतीच्या याचिकेवर कौटुंबिक न्यायालयाने मोबाइल कंपनीला कॉल डिटेल्स तसेच मोबाइल लोकेशन देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात पत्नीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
काय आहे प्रकरण?
पत्नीचे अवैध संबंध असल्याचे पतीने न्यायालयात सांगितले. पतीने कोर्टाला पत्नीच्या प्रियकराच्या फोनचे तपशील मागितले होते, ज्यामुळे त्याचे लोकेशन ट्रेस होईल आणि तो त्याच्या अनुपस्थितीत तिच्या घरी जायचा हे सिद्ध होईल,असे तो म्हणाला. त्यानंतर कोर्टाने फोनचे डिटेल्स मागविले होते.
फसवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप
महिलेने कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की, तिच्यावर अवैध संबंध असल्याच्या आरोपाखाली फसवले जात आहे. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी या प्रकरणात महिलेच्या प्रियकराचे मोबाइल डिटेल्स घेता येणार नाहीत, असे म्हटले आहे. हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे.