अरे देवा! नवऱ्याने 10 ऐवजी 30 रुपयांची लिपस्टिक आणली; नाराज होऊन बायको गेली माहेरी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 10:42 AM2024-03-04T10:42:49+5:302024-03-04T10:43:04+5:30
पतीला 30 रुपयांची लिपस्टिक विकत घेणं महागात पडलं आहे. लिपस्टिकवरून वाद इतका वाढला की पती-पत्नीमध्ये घटस्फोट घेण्याची वेळ आली आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला 30 रुपयांची लिपस्टिक विकत घेणं महागात पडलं आहे. लिपस्टिकवरून वाद इतका वाढला की पती-पत्नीमध्ये घटस्फोट घेण्याची वेळ आली आहे. पत्नीला 30 रुपये किमतीची लिपस्टिक इतकी महाग वाटली की ती नाराज होऊन माहेरी गेली. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
पतीने फक्त 10 रुपयांची लिपस्टिक आणावी अशी पत्नीची इच्छा होती. पतीने महागडी लिपस्टिक आणल्यावर पत्नीला राग आला. एवढेच नाही तर तिने पतीविरोधात पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्राकडे पाठवलं आहे. समुपदेशन केंद्रात दोघांचीही समजूत घालण्याचा प्रयत्न करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एत्मादपूर पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणीचा मथुरा जिल्ह्यातील महावन येथील तरुणाशी विवाह झाला होता. दोघांनी 2022 मध्ये लग्न केलं. हा तरुण एका खासगी कंपनीत काम करतो. पत्नीने पतीकडे लिपस्टिक आणण्याची मागणी केली होती. पती लिपस्टिक घेऊन घरी आला. लिपस्टिक जमिनीवर फेकून पत्नीने भांडण सुरू केलं.
पत्नीने विचारलं की, इतकी महागडी लिपस्टिक का आणली? कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पत्नीने आरोप केला की पती जास्त पैसे खर्च करतो. भविष्यासाठी काहीही वाचवत नाही. पत्नीने पुढे सांगितले की, तो 30 रुपयांपेक्षा स्वस्त लिपस्टिक आणू शकला असता. पण त्याने माझे ऐकले नाही.
दुसरीकडे पतीने सांगितले की, 30 रुपयांपेक्षा स्वस्तात कोणतीही लिपस्टिक उपलब्ध नाही. म्हणूनच त्याने ही लिपस्टिक आणली आहे. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. पत्नी गेल्या एक महिन्यापासून तिच्या माहेरच्या घरी राहत होती.
हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रात आल्यानंतर समुपदेशक सतीश खीरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महागडी लिपस्टिक आणण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. बायकोला मुलांसाठी पैसे वाचवायचे आहेत. पत्नीला समजावलं आहे. सध्या दोघांची समजूत काढण्यात आली आहे.