पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचे विमान झाले गायब; कुटुंबीय चिंताग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 02:57 AM2019-06-07T02:57:52+5:302019-06-07T02:58:10+5:30
तन्वर कुटुंबिय मूळचे हरयाणाच्या पलवलचे आहे. हुडा सेक्टर २ येथे ते राहतात. एएन-३२ विमानाचा अजूनही शोध लागलेला नाही. प्रत्येक तासागणिक कुटुंबाची चिंता वाढत चालली आहे.
नवी दिल्ली : हवाई दलाचे एएन-३२ मालवाहतूक विमान सोमवारी दुपारी बेपत्ता झाले. वैमानिक आशिष तन्वर (२९) हेही बेपत्ता झाले. त्यांची पत्नी संध्या हवाई दलाच्या वाहतूक नियंत्रण कक्षात सेवेवर होत्या. पत्नीच्या डोळ्यादेखत पायलट पतीचे विमान रडारवरून गायब झाले. हा घटनाक्रम त्यांनी जवळून अनुभवला. एएन-३२ ने दुपारी १२.२५ च्या सुमारास आसामच्या जोरहट तळावरुन अरुणाचल प्रदेशमधील मिचुका येथे जाण्यासाठी उड्डाण केले.
तन्वर कुटुंबिय मूळचे हरयाणाच्या पलवलचे आहे. हुडा सेक्टर २ येथे ते राहतात. एएन-३२ विमानाचा अजूनही शोध लागलेला नाही. प्रत्येक तासागणिक कुटुंबाची चिंता वाढत चालली आहे. अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आणि अद्ययावत माहिती मिळावी म्हणून आशिषचे वडिल राधेलाल आसामला गेले आहेत. त्याची आई घरीच आहे. या घटनेमुळे आई पूर्णपणे कोसळून गेली आहे. त्यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बेपत्ता विमानाच्या शोधासाठी सर्व ती यंत्रणा कामी आणावी अशी मागणी केली. तन्वर कुटुंबाला लष्करी सेवेची परंपरा आहे. आशिषची मोठी बहिणही हवाई दलामध्ये स्क्वाड्रन लीडर आहे.
आशिषचे चुलते उदयवीर सिंह यांनी सांगितले की, दुपारी एकच्या सुमारास विमानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. तासाभराने संध्याने आम्हाला फोन करुन काय घडले याची कल्पना दिली. सुरुवातीला आम्हाला विमान चीनच्या हद्दीत गेल्यानंतर तिथे त्यांनी इमर्जन्सी लँडिंग केले असावे असे वाटत होते; पण असे घडले असते तर आतापर्यंत त्यांनी संपर्क साधला असता.
बेपत्ता वैमानिक मुलाच्या शोधासाठी वडिलांची शर्थ
हवाई दलाच्या बेपत्ता असलेल्या एएन-३२ विमानामधील तेरा जणांपैकी फ्लाईट लेफ्टनंट मोहित गर्ग (२७) हेही एक आहेत. काही दिवसांपूर्वीच सुटी संपवून ते सेवेत दाखल झाले होते. गर्ग यांचे कुटुंबीय पतियाळा (पंजाब) येथील सामना गावी परतले असून, काही तरी चमत्कार घडावा अशी प्रार्थना करीत आहेत.
मोहित यांची आई सुलोचना देवी हृदय विकाराने त्रस्त असल्याने त्यांना या दुर्घटनेबाबत काही सांगण्यात आलेले नाही. मोहित यांचे वडील शोधासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत.