हुश्श..अखेर ५ कोटी ७९ लाख प्राप्त मनपा: एलबीटी अनुदान पदरात
By admin | Published: August 25, 2015 12:38 AM2015-08-25T00:38:39+5:302015-08-25T22:43:40+5:30
महसूल विभागाकडून शासन आदेशाप्रमाणे ५ कोटी ७९ लाखांचे अनुदान सोमवारी प्राप्त झाले.
जळगाव : एलबीटी वसुली बंद झाल्याने हक्काचे पैसा मिळणे बंद झाल्याने अडचणीत आलेल्या महापालिकेने महसूल विभागाकडून शासन आदेशाप्रमाणे ५ कोटी ७९ लाखांचे अनुदान सोमवारी प्राप्त झाले.
एलबीटीच्या माध्यमातून महापालिकेस वर्षाकाठी ६५ कोटींची वसुली होत असे. मात्र १ ऑगस्टपासून शासनाने एलबीटी बंदचा निर्णय घेतल्याने महापालिचे हक्काचे उत्पन्न बंद झाले. अगोदरच आर्थिक अडचणीत असलेली महापालिका यामुळे अधिकच अडचणीत आली. अनेक महिन्यांपासून कर्मचार्यांचे पगारही थकले आहेत. पैसा नसल्याने शिक्षकांचे ५० टक्के वेतन देणे शक्य नसल्याने मोठे आंदोलनही झाले होते. त्यामुळे बंद झालेेल्या एलबीटीपोटी पोटी अनुदान मिळावे अशी मनपाकडून अपेक्षा केली जात होती. गेल्या आठवड्यात अनुदानाची प्रतीक्षा संपली. शासनाकडून महापालिकेस ५ कोटी ७९ लाखांचे अनुदान मंजूर झाले. हा निधी जिल्हा प्रशानाकडून प्राप्त झाला. मात्र जिल्हा प्रशासनाकडून करांच्या थकीत १२ कोटींच्या वसुलीपोटी ही रकम जमा करून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. हा प्रकार शासनाच्या लक्षात आल्याने शासनानेदेखील अशा प्रकारच्या परस्पर वसुलीस नकार दिला. त्यामुळे ही रकम मनपाकडे सोमवारी वर्ग करण्यात आली.
ही रकम मनपाच्या नव्या खात्यात वर्ग करण्याच्या सूचना असल्याने या अनुदानाचे स्वतंत्र खाते उघडण्याची प्रक्रिया सकाळी सुरू झाली. हा निधी आता महापालिका कोणत्या कारणासाठी वापरते यावर एक दोन दिवसात निर्णय अपेक्षित आहे.