Hyderabad Encounter : 'जे झालं ते देशासाठी भयानक, तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाहीत'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 03:01 PM2019-12-06T15:01:30+5:302019-12-06T15:02:04+5:30
Hyderabad Case : हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर कायद्याला धरून नव्हतं,
हैदराबादमधील 'दिशा' रेड्डी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना पहाटे घडली. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तर, विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनीही या एन्काऊंटरबाबात संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर, खासदार मनेका गांधी यांनीही जे घडलं ते भयानक आहे, अशा भावना व्यक्त केल् आहेत.
हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर कायद्याला धरून नव्हतं, हे एन्काऊंटर अयोग्य होतं' असं स्पष्ट मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे. 'झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण, शेवटी ते दरोडेखोरच होते,' असंही निकम यांनी सांगितलं. निकम यांच्यासह प्रकाश आंबेडकर आणि निलम गोऱ्हे यांनीही या एन्काऊंटर कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तर, खासदार मनेका गांधी यांनीही या एन्काऊंटरला भयानक म्हटलं आहे. देशासाठी भयानक काळ सुरू होईल, असे मनेका यांनी म्हटलंय. संसदभवन परिसरात माध्यमांशी बोलताना मनेका गांधींनी आपलं मत परखडपणे मांडलं. जे झालं ते देशासाठी अतिशय भयानक आहे. केवळ तुम्हाला तसं करायचंय, म्हणून तुम्ही लोकांचा जीव घेऊ शकत नाहीत. तुम्ही कायद्याला हातात घेऊ शकत नाहीत. त्या आरोपींना न्यायालयाकडून फाशी मिळणार होतीच, असेही गांधींनी म्हटलंय.
दरम्यान, एबीपी माझाशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हैदराबादमध्ये ज्यांनी एन्काऊंटर केलं आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. कायद्याची प्रक्रिया आहे ती ओलांडता येत नाही. झटपट न्याय देण्याची प्रथा पोलिसांनी सुरू केली आहे. त्या पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. आरोपीला अशाप्रकारे संपविता येत नाही, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करुन महिना-दोन महिन्यात हे प्रकरण संपवता आलं असतं असेही आंबेडकर यांनी म्हटलंय. तर एन्काऊंटरमुळे फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, पोलिसांच्या ताब्यात असताना असं एन्काऊंटर होतं. त्यावेळी पोलीस यंत्रणेबद्दल शंका येते, यातील मुख्य सुत्रधार समोर येत नाही, एन्काऊंटर केले की घडवले याची चौकशी करावी. सीआयडी अथवा सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
हैदराबाद पोलिसांच्या कारवाईनंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पण, सर्वसामान्य नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक केलं जातंय. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाला हदरवून टाकणारं हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा खात्मा पोलिसांनी केला आहे. ज्या ठिकाणी आरोपींनी पीडित तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचठिकाणी पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलीस तपासावेळी हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ही घटना घडली. तेलंगणा पोलिसांकडून या 4 आरोपींना घटनास्थळावर तपासासाठी नेलं होतं. त्यावेळी घटनेचा रिक्रिएशन समजून घेताना त्यातील आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी गोळीबार करत आरोपींचा एन्काऊंटर केला.