हैदराबाद निवडणूक: ओवेसींनी तिकीट दिलेल्या 'त्या' ५ हिंदू उमेदवारांचं काय झालं?
By मोरेश्वर येरम | Published: December 5, 2020 03:29 PM2020-12-05T15:29:21+5:302020-12-05T15:31:46+5:30
हैदराबाद महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने एकूण ५१ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.
हैदराबाद
ग्रेटर हैदराबादच्या महानगरपालिका निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून 'एमआयएम' पक्ष 'किंगमेकर'च्या भूमिकेत गेला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीला (टीआरएस) सर्वाधिक ५५ जागा मिळाल्या आहेत. तर एमआयएम पक्षाला ४४ जागांवर यश प्राप्त झालं आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी आपल्या पक्षातून ५ जागांवर हिंदू उमेदवार देखील उभे केले होते.
हैदराबाद महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने एकूण ५१ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यात पक्षाकडून १० टक्के हिंदू उमेदवारांना आरक्षण देऊन ५ हिंदू उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या ५ उमेदवारांपैकी ३ उमेदवार विजयी झाले आहेत. तर दोन जागी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. विशेष म्हणजे, गेल्या निवडणुकीत केवळ ४ जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपने यावेळी जोरदार मुसंडी मारत ४८ जागांवर विजय प्राप्त केला आहे.
ओवेसी यांच्या पक्षाकडून हिंदू उमेदवारांमध्ये पुरानापूल वॉर्डमधून सुन्नम राज मोहन, फलकनुमा वॉर्डातून के.थाराभाई आणि कारवान वॉर्डातून मांदागिरी स्वामी यादव यांनी विजय प्राप्त केला आहे. तर जामबाग वॉर्डात जदाला रविंद्र यांना भाजपच्या राकेश जयस्वाल यांच्याविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. कुतुबुल्लापूर वॉर्डातून एमआयएमचे ई.राजेश गौड यांना टीआरएस पक्षाच्या गौरिश पारिजाता यांनी मात दिली.
कुणाला किती जागा?
हैदराबाद महापालिका निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीला अर्थात टीआरएसला ५५ जागांवर यश मिळालं आहे. तर भाजपने ४८ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. एमआयएम पक्ष ४४ जागांसह तिसऱ्या स्थानी आहे. या सगळ्यात काँग्रेसला फक्त २ जागांवर समाधान मानवं लागलं आहे.