Hyderabad Encounter: न्यायालयाचे 9 डिसेंबरपर्यंत आरोपींचे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 11:28 PM2019-12-06T23:28:37+5:302019-12-06T23:33:18+5:30
हैदराबादमध्ये पशु चिकित्सक तरुणीवर बलात्कार करणाऱ्यांना चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला.
तेलंगणाः हैदराबादमध्ये पशु चिकित्सक तरुणीवर बलात्कार करणाऱ्या चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यानंतर अनेकांनी पोलिसांच्या या कृतीचं स्वागत केलं आहे, तर काहींनी विरोध देखील केला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयानं राज्य सरकारला निर्देश देत सांगितलं की, पीडितेवर अत्याचार करून तिला जाळणाऱ्या नराधमांचे मृतदेह 9 डिसेंबर रात्री 8 वाजेपर्यंत सुरक्षित ठेवा. या चारही आरोपींची हत्या कायद्याला धरून नसल्याचा आरोप होऊ लागल्यानं न्यायालयानं हे मृतदेह सुरक्षित ठेवण्यास सांगितले आहेत.
आरोपींचा शवविच्छेदनाच्या अहवालाची सीडी किंवा पेन ड्राइव्ह मेहबूबनगरमधल्या जिल्हा न्यायाधीशांकडे सोपवण्यास सांगितलं आहे. तसेच प्रधान जिल्हा न्यायाधीशांनी ती सीडी किंवा पेन ड्राइव्ह शनिवारी संध्याकाळप्रयंत उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलला देण्याचे निर्देशही दिले आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा(एनएचआरसी)नं या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
दरम्यान, हैदराबाद बलात्कार पीडितेच्या हत्येप्रकरणी पोस्ट मॉर्टेम अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले होते. प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियंकाला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून, ट्रक ड्रायव्हरांसह त्यांच्या क्लिनर्सनी पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
पीडित शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशु चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितेची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडिता स्कूटरजवळ आली, तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कूटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले, तेव्हा पीडितेने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत, असं सांगितलं. थोड्या वेळाने कॉल करते असं सांगून पीडितेने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री ९. १५ वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.