Hyderabad Encounter: हैदराबादमधल्या चकमकीचा तपास झालाच पाहिजे– ओवैसी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 09:45 PM2019-12-06T21:45:38+5:302019-12-06T21:47:58+5:30
हैदराबाद बलात्कारातील चारही नराधमांना ठार करण्यात आल्यानंतर समाज माध्यमांतून संमिश्र पडसाद उमटू लागले आहेत.
तेलंगणा- हैदराबाद बलात्कारातील चारही नराधमांना ठार करण्यात आल्यानंतर समाज माध्यमांतून संमिश्र पडसाद उमटू लागले आहेत. राजकीय नेत्यांकडूनही या प्रकारावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेकांनी पोलिसांच्या कृतीचं समर्थन केलं असलं तरी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी याचा विरोध केला आहे. या चकमकीवर ओवैसींनी आक्षेप घेतला आहे. मी या चकमकीच्या विरोधात आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चकमकीची दखल घेतली आहे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे या चकमकीचाही तपास झाला पाहिजे, अशी मागणी असदुद्दीन ओवैसींनी केली आहे.
Hyderabad MP and AIMIM Chief Asaduddin Owaisi: I am against encounters. Even, National Human Rights Commission has taken cognizance of the encounter. #Telanganapic.twitter.com/VgxV6r6WRB
— ANI (@ANI) December 6, 2019
हैदराबादमध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही या एन्काऊंटरबाबत संशय व्यक्त केला आहे. हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर कायद्याला धरून नव्हतं, हे एन्काऊंटर अयोग्य होतं' असं स्पष्ट मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, हैदराबाद बलात्कार पीडितेच्या हत्येप्रकरणी पोस्ट मॉर्टेम अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले होते. प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियंकाला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून, ट्रक ड्रायव्हरांसह त्यांच्या क्लिनर्सनी पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
पीडित शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशु चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितेची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडिता स्कूटरजवळ आली, तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कूटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले, तेव्हा पीडितेने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत, असं सांगितलं. थोड्या वेळाने कॉल करते असं सांगून पीडितेने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री ९. १५ वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.