Hyderabad Encounter: 'मलाही तिथंच नेऊन गोळी घाला', 20 वर्षीय आरोपीच्या पत्नीने टाहो फोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 08:39 AM2019-12-07T08:39:43+5:302019-12-07T08:43:18+5:30
Hyderabad Encounter: चेन्नाकेशवुलूची पत्नी तर सतत रडत होती. ती म्हणाली की मी आता एकटी राहिली आहे.
हैदराबाद - संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी शुक्रवारी पहाटे पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. चौघा संशयीतांना ठार केल्यामुळे देशातील अनेकांनी आनंद व्यक्त केला असून, हैदराबादमध्ये अनेकांनी मिठाई वाटली, पोलीस अधिकाऱ्यांवर फुले उधळली आणि अनेक महिलांनी पोलिसांना राख्याही बांधल्या. मात्र, ज्या 4 आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आलाय, त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेचा मोठा धक्का बसलाय.
हैदराबाद बलात्कार प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद आरिफ (26), जोलू शिवा (20), जोलू नवीन (20), चिंताकुन्टा चेन्नाकेसवलू (20) या चार आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर, न्यायालयाने या चौघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, पोलीस कोठडीत असतानाच हैदराबाद पोलिसांनी एनकाऊंटर करुन चारही आरोपींना ठार केले. हैदराबाद पोलिसांच्या धाडसी कारवाईनंतर बलात्कारपीडित महिलेच्या कुटुंबीयांनी आम्हाला न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त केली आहे. मात्र, आरोपींच्या कुटुंबींयांनी आमच्यावर अन्याय झाल्याचं म्हटलंय. मोहम्मद आरिफच्या आईला बोलताच येत नव्हते. मात्र, आपल्या मुलाने हा गुन्हा केला असेल, तर त्याला सर्वात कडक शिक्षा देण्यात यावी, असे त्याच्या वडिलांनी आधीच म्हटले होते.
चेन्नाकेशवुलूची पत्नी तर सतत रडत होती. ती म्हणाली की मी आता एकटी राहिली आहे. तिचा चेन्नाकेशवुलूशी अलीकडेच विवाह झाला होता. त्याला मूत्रपिंडाचा आजार होता. माझ्या नवऱ्याला काही होणार नाही आणि तो लवकरच घरी परतेल, असे मला सांगण्यात आले होते, पण आता काय करावे, मला सुचत नाही, असे तिने बोलून दाखविले. सिवा नावाच्या आरोपीची आई जोल्लू रामप्पा म्हणाली की, माझ्या मुलाने तो गुन्हा केलाही असेल. पण, त्यासाठी दिलेली शिक्षा खूपच भयंकर आहे. हे चारही संशयीत अतिशय गरीब कुटुंबातील होते. पण त्यांनी नंतर कष्टाने बऱ्यापैकी पैसा मिळविला. मात्र, दारू आणि इतर व्यसनांनी त्या चौघांचा नाश केला.
पशुवैद्यकीय तरुणीवर 28 नोव्हेंबर रोजी या चार आरोपींनी सामुहिक बलात्कार केल्यानंतर त्या भयानक छळाने ती मरण पावली. पुरावा नष्ट करण्यासाठी या नराधमांनी तिचा मृतदेह जाळून टाकला होता. या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त करण्यात आला आणि संसदेमध्येही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.