मोठी बातमी! गृहमंत्री अमित शाहांच्या सुरक्षेत मोठी चूक, TRS नेत्यानं थेट शाहांसमोरच कार लावली आडवी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 01:48 PM2022-09-17T13:48:05+5:302022-09-17T13:48:32+5:30
हैदराबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
हैदराबाद-
हैदराबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार तेलंगना राष्ट्र समितीच्या (टीआरएस) एका कार्यकर्त्यानं अमित शाहांच्या ताफ्यासमोरच आपली कार आडवी लावली. यामुळे एकच गदारोळ उडाला. पोलिसांना ही कार हटवावी लागली. वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जी श्रीनिवास नावाच्या टीआरएस नेत्याने गृहमंत्री अमित शाह यांच्या ताफ्यासमोर कार पार्क केली होती. श्रीनिवास यांनी मात्र आपली कार आपोआप थांबली आणि त्यावेळी मी खूप टेन्शनमध्ये आलो होतो. याबाबत मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणार आहे, असं म्हटलं आहे.
पोलिसांनी जबरदस्तीनं गाडी बाजूला करताना तोडफोड केल्याचा आरोप टीआरएस नेत्यानं केला. "मी निघून जात असतानाही हे प्रकरण जाणीवपूर्वक वाढवलं गेलं", असा आरोप श्रीनिवास यांनी केला आहे. केंद्र सरकारकडून आज 'हैदराबाद मुक्ती दिना'निमित्त सिकंदराबादमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा हे प्रमुख पाहुणे असून या कार्यक्रमानिमित्त ते हैदराबाद दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी आज हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांना दिलं. तसंच व्होट बँकेच्या राजकारणामुळे आणि रझाकारांच्या "भीती"मुळे "मुक्ती दिन" साजरा करण्याच्या वचनावर पाणी सोडणाऱ्यांना शाहांनी आपल्या भाषणातून फटकारलं.
सरदार पटेल नसते तर...
हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात शाह म्हणाले की, जर सरदार पटेल नसते तर हैदराबाद मुक्त व्हायला अजून बरीच वर्षे लागली असती. निजामाच्या रझाकारांचा पराभव झाल्याशिवाय अखंड भारताचे स्वप्न साकार होणार नाही हे पटेलांना माहीत होतं, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. 'इतक्या वर्षांनंतर सरकारच्या सहभागाने ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ साजरा व्हावा, ही या भूमीतील जनतेची इच्छा होती, मात्र ७५ वर्षांनंतरही मतपेटीचं राजकारण सुरू आहे, हे दुर्दैव आहे. इथे यामुळे "हैदराबाद मुक्ती दिन" साजरा करण्याचं धाडस काहींना जमलं नाही', असंही शाह म्हणाले.