हैदराबाद मुक्ती दिन साजरा करणार नाही
By admin | Published: September 8, 2016 05:10 AM2016-09-08T05:10:11+5:302016-09-08T05:10:11+5:30
भाजपने १७ सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’ म्हणून अधिकृतपणे साजरा करण्याची केलेली सूचना सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने फेटाळून लावताना भाजप ‘फूट पाडणारे राजकारण’ करीत असल्याचा आरोप केला.
हैदराबाद : भाजपने १७ सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’ म्हणून अधिकृतपणे साजरा करण्याची केलेली सूचना सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने फेटाळून लावताना भाजप ‘फूट पाडणारे राजकारण’ करीत असल्याचा आरोप केला.
नेमस्त स्वभावाच्या तेलंगणातील लोकांचा या मुक्तिदिनावर विश्वास नाही. भारतात ज्या दिवशी तेलंगण विलीन झाले तो दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असे टीआरएसच्या खासदार कल्वकुंतला कविता म्हणाल्या. त्या तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत.
केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, १५ आॅगस्ट १९४७ रोजी देश अत्यंत परिश्रमांनी मिळविलेल्या स्वातंत्र्याचा आनंद उपभोगत असताना तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला त्या स्वातंत्र्यासाठी १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत वाट बघावी लागली.’’ त्यादिवशी (१७ सप्टेंबर) जुलमी निझामाच्या राजवटीतून हैदराबाद संस्थान मुक्त होऊन भारतात विलीन झाले. १७ सप्टेंबर हा दिवस अधिकृतपणे ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’ म्हणून साजरा व्हावा अशी मागणी भाजप गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे परंतु काही राजकीय पक्ष देशाच्या एकात्मतेशी संबंधित प्रश्नांकडेही मतपेटीच्या नजरेतून बघतात, असेही नायडू म्हणाले होते.
निजामाच्या जुलमी राजवटीमध्ये तेलगू भाषेला शैक्षणिक संस्थांमध्ये माध्यम म्हणून वापरण्यास नाउमेद करण्यात आले होते, असे नायडू यांनी सांगितले. त्यावर निजामबाद मतदारसंघातून निवडून आलेल्या खा. कविता म्हणाल्या की, ‘‘तेलंगणला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा, ही मागणी होत असताना हा दिवस (१७ सप्टेंबर) टीआरएसने विलिनीकरण दिवस म्हणूनच साजरा केला व पक्षाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वजही फडकावला. कारण आंध्र प्रदेश सरकार या दिवसाला मान्यता देत नाही.’’ (वृत्तसंस्था)