CoronaVirus: देवदूत! कोरोना संकटात घरमालक मदतीला धावला; ७५ कुटुंबांचं भाडं माफ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 03:16 PM2020-04-13T15:16:30+5:302020-04-13T15:17:05+5:30
coronavirus संवेदनशील घरमालकानं ३.४ लाख रुपयांवर सोडलं पाणी
कोरोनाचा फैलाव वाढत चालल्यानं अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. स्वत:चं घर नसलेल्या, भाड्यानं राहणाऱ्या कुटुंबांवर तर संकट कोसळलं आहे. भाडं कसं भरायचं, खायचं काय, अशा विवंचनेत अडकलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. अशाच काही कुटुंबांच्या मदतीला एक घरमालक अगदी देवासारखा धावून गेला आहे. हैदरामध्ये राहणाऱ्या कोडुरी बालालिंगम यांनी त्यांच्या ७५ भाडेकरुंचं घर भाडं माफ केलं आहे. त्यामुळे भाडेकरूंना संकटाच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे.
बालानगरमध्ये राहणाऱ्या बालालिंगम यांच्या मालकीच्या तीन इमारती आहेत. यामध्ये ७५ भाडेकरु वास्तव्यास आहेत. यातले बहुतांश जण बिहारमधले असून ते मजुरीचं काम करतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्यासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यांची अडचण समजून घेत बालालिंगम यांनी त्यांच्याकडून भाडं न घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे बालालिंगम यांना ३.४ लाखांवर पाणी सोडावं लागलं. मात्र मजुरांची परिस्थिती समजून घेत त्यांनी स्वत:हूनच हा निर्णय घेतला.
लॉकडाऊनमुळे मजुरांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे किमान घर भाडं माफ केल्यानं त्यांना थोडा दिलासा मिळेल, असा विचार माझ्या मनात आला, असं बालालिंगम यांनी सांगितलं. पुढील महिन्याचं भाडंदेखील माफ करायचं असा विचार सध्या माझ्या मनात सुरू असल्याचंही ते म्हणाले. घर भाडं माफ करण्यासोबतच त्यांनी तेलंगणा आणि आंध्पर प्रदेशातल्या २५० कुटुंबांना आर्थिक आधार दिला. त्यासाठी त्यांनी जवळपास २.५ लाख रुपये खर्च केले.
मूळचे राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्याचे रहिवासी असलेले बालालिंगम १९९६ मध्ये हैदराबादला आले. त्यांनी एका कारखान्यात ९ वर्षं काम केलं. २००५ मध्ये त्यांनी स्वत:चा कारखाना सुरू केला. यामध्ये सध्या २० कामगार काम करतात. बालालिंगम यांनी अनेक मुलांना शिष्यवृत्ती दिली असून स्वत:च्या गावात जलसंवर्धन प्रकल्पदेखील सुरू केला आहे.