हैदराबाद निजामाचा जेवणाचा डबा, चहाचा कप चोरला; वाचा किती होता किंमती...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 06:13 PM2018-09-04T18:13:48+5:302018-09-04T18:18:28+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही वस्तूंची किंमत करोडो रुपयांना असल्याचे समजते. या वस्तू सातवा निजाम मीर उस्मान अली खान यांना भेटीदाखल मिळाल्या होत्या.
हैदराबाद : हैदराबादमधील जुन्या राजवाड्यामध्ये निजामाच्या वस्तूंच्या संग्रहालयातून सोन्याचा डबा आणि हिऱ्यांनी मढवलेला कप चोरी झाल्याने मोठी खळबळ माजली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही वस्तूंची किंमत करोडो रुपयांना असल्याचे समजते. या वस्तू सातवा निजाम मीर उस्मान अली खान यांना भेटीदाखल मिळाल्या होत्या.
पोलीस अधिकाऱ्यांनुसार रविवारी रात्री ही चोरी झाली. सोमवारी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत नोंद केली. या डबा 2 किलो वजनाचा आहे. यावर किंमती हिरे आणि माणिक लावलेले आहेत. याची किंमत जवळपास 50 कोटी रुपये आहे. हा डबा संग्रहालयाच्या चौथ्या मजल्यावर ठेवला होता. या संग्रहालयामध्ये 450 ऐतिहासिक वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये काही वस्तू सहावा निजाम मीर महबूब अली खान यांच्याही वस्तू आहेत.
चोरट्यांनी दोरीच्या सहाय्याने चौथा मजला गाठला. यानंतर झरोक्याच्या काचेच्या खिडकीतून त्यांनी आत प्रवेश केला. सोमवारी सकाळी संग्रहालयातील वस्तू गायब असल्याचे दिसले. पोलिसांनी चोरीला गेलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी 10 पथके रवाना केली आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे.