हैदराबाद एन्काऊंटरमधील 2 आरोपींनी यापूर्वीही केले होते 9 बलात्कार; तपासात धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 02:53 PM2019-12-18T14:53:51+5:302019-12-18T14:57:52+5:30
हैदराबादमध्ये एन्काऊंटर झालेल्या 4 आरोपींपैकी दोघांवर यापूर्वी 9 महिलांसोबत बलात्कार केल्याचं उघड झालं आहे
हैदराबाद - तेलंगाणा येथे 27 नोव्हेंबरला झालेल्या एका महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी चारही आरोपींचा एन्काऊंटर केला होता. त्यानंतर पोलिसांच्या या कारवाईचं जनतेकडून कौतुक झालं तसेच काही जणांनी या एन्काऊंटरची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर येत आहे.
हैदराबादमध्ये एन्काऊंटर झालेल्या 4 आरोपींपैकी दोघांवर यापूर्वी 9 महिलांसोबत बलात्कार केल्याचं उघड झालं आहे असा दावा चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केला आहे. तपासादरम्यान या दोन्ही आरोपींनी 9 महिलांसोबत बलात्कार करुन त्यांना अशाचप्रकारे जाळून मारलं असल्याचं कबुली दिली होती. त्यानंतरच हैदराबाद पोलिसांनी या आरोपींना एन्काऊंटरमध्ये ठार मारलं.
सध्या साइबराबाद पोलीस आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कर्नाटकात तपास करत आहे. कारण यातील काही घटना तेलंगणा, कर्नाटक सीमाभागात घडल्या आहेत. मोहम्मद आरिफ, जे नवीन, जे शिवा आणि चेन्नाकेशवुलू यांनी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जाळून ठार मारलं होतं.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार या आरोपींना कस्टडीमध्ये घेतल्यानंतर आम्हाला तेलंगणा आणि कर्नाटक हायवेवर महिलांसोबत बलात्कार आणि जाळून मारणे अशा 15 घटनांच्या तपासात महत्वाचे धागेदोरे हाती लागले. या 15 पैकी 9 घटनांमध्ये यातील दोघा आरोपींचा समावेश असल्याचं त्यांनी कबूल केलं होतं. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम तपासासाठी घटनास्थळी पाठविण्यात आल्या.
तेलंगणा पोलिसांचा दावा आहे की, आरिफचा सहा गुन्ह्यामध्ये समावेश आहे तर चेन्नाकेशवुलू याचा तीन महिलांचा बलात्कार आणि हत्या प्रकरणात समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार तेलंगणासह संगा रेड्डी, रंगा रेड्डी आणि महबूबनगर हायवे, कर्नाटकातील सीमावर्ती भागातील शहरात या घटना घडल्या आहेत.
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 27 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी मध्यरात्री एन्काऊंटर केला आहे. त्यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरातून तर सोशल मीडियावर हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं जातं होतं.