Viral: माणुसकीचा धर्म; वृद्धेला खाऊ घालणाऱ्या 'या' पोलिसानं जिंकली नेटकऱ्यांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 12:21 PM2018-04-02T12:21:57+5:302018-04-02T12:21:57+5:30
हैदराबादमधील एका ट्रॅफिक पोलीसावर सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
हैदराबाद- रस्त्यांवरील सिग्नलवर उभे असलेले ट्रॅफिक पोलीस नेहमीच प्रवाशांना हेल्मेटवरून किंवा चुकीच्या रस्त्याने गाडी टाकल्यामुळे तसंच इतर अनेक गोष्टींसाठी अडवताना दिसतात. अनेकदा या ट्रॅफिक पोलिसांचा आपल्याला रागही येतो. पण सध्या हैदराबादमधील एका ट्रॅफिक पोलीसावर सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. हैदराबादमधील कुकुटपल्ली ट्रॅफिक पोलीस स्टेशनचे होम गार्ड बी गोपाळ यांचं कौतुकास्पद कामं चर्चेचा विषय आहे. गोपाळ यांचा एका वृद्ध महिलेला जेवण भरवतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो नेटिझन्सकडून शेअरही केला जातो आहे.
कुकाटपल्लीमधील जेएनटीयूजवळ रस्त्यांच्या बाजूला एक गरिब वृद्ध महिला गोपाळ यांना आढळली. अत्यंत दयनीय अवस्थेत ही वृद्ध महिला होती. त्या महिलेला पाहून गोपाळ यांनी तिच्यासाठी पुऱ्या खरेदी केल्या. महिलेची प्रकृती अत्यंत दयनिय असल्याने तिला खाताही येत नव्हतं म्हणून गोपाळ यांनी स्वतःच्या हाताने त्या महिलेला पुरी खायला घातली. महिलेला जेवण भरवतानाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गोपाळ यांच्या या फोटोला सोशल मीडियावर प्रचंड शेअर केलं जातं आहे. 'यालाच बदल म्हणतात'. 'माणूसकी काय असते, हे सांगणारा हा फोटो आहे'. अशा कमेन्ट नेटिझन्सकडून येत आहेत.