हैदराबाद विद्यापीठाच्या दहा शिक्षकांची राजीनाम्याची धमकी
By Admin | Published: January 21, 2016 09:52 AM2016-01-21T09:52:07+5:302016-01-21T13:17:51+5:30
रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर हैदराबाद विद्यापीठात निर्माण झालेली परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली आहे.
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. २१ - रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर हैदराबाद विद्यापीठात निर्माण झालेली परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली आहे. हैदराबाद विद्यापीठातील एससी आणि एसटी शिक्षकांनी पाच विद्यार्थ्यांच्या निलंबना विरोधात आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून आपल्या सर्व प्रशासकीय पदांचा राजीनामा देण्याची धमकी दिली आहे.
विद्यापीठातील एससी/एसटी शिक्षक आणि अधिका-यांच्या संघटनेने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानांचा निषेध केला. या प्रकरणात स्मृती इराणी यांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.
रोहित वेमुलाच्या मृत्यू प्रकरणी आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावे तसेच विद्यार्थ्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी संघटनेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केली आहे.
विद्यापीठाच्या एससी/एसटी शिक्षक संघटनेने पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे अशी माहिती फोरमचे संयोजक सुधाकर बाबू यांनी दिली. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, आम्ही राजीनामा देऊ. सर्व विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द करा आणि रोहितच्या कुटुंबाला नुकसानभरपाई द्या या संघटनेच्या मागण्या सुधाकर बाबू यांनी सांगितल्या.