बापरे! स्ट्रीट फूड स्टॉलवर मोमोज खाणं बेतलं जीवावर; महिलेचा मृत्यू, १५ जण पडले आजारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 11:50 AM2024-10-29T11:50:41+5:302024-10-29T11:51:23+5:30

हैदराबाद येथून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे रस्त्यावरील स्टॉलवर मोमोज खाल्ल्याने १५ लोक आजारी पडले, तर एका महिलेचा मृत्यू झाला.

hyderabad woman dead after eating momos fifteen people fall ill in banjara hills | बापरे! स्ट्रीट फूड स्टॉलवर मोमोज खाणं बेतलं जीवावर; महिलेचा मृत्यू, १५ जण पडले आजारी

बापरे! स्ट्रीट फूड स्टॉलवर मोमोज खाणं बेतलं जीवावर; महिलेचा मृत्यू, १५ जण पडले आजारी

गेल्या काही वर्षांत मोमोज हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड बनले आहे. मात्र, ते खाल्ल्यानंतर अनेक जण आजारी पडल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे रस्त्यावरील स्टॉलवर मोमोज खाल्ल्याने १५ लोक आजारी पडले, तर एका महिलेचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंजारा हिल्स पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नंदीनगरमध्ये एक दुःखद घटना घडली, जिथे रस्त्यावरील स्टॉलवर मोमोज खाल्ल्याने एका ३१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रेश्मा बेगम असं या महिलेचं नाव असून त्या नंदीनगर येथील रहिवासी आहेत. याशिवाय याच स्टॉलवर मोमोज खाल्ल्याने आणखी १५ जण आजारी पडले.

महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली की, मोमोज खाल्ल्याने ती आजारी पडली आणि नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे तिचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पुढील कारवाईबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे ते म्हणाले.

अधिकाऱ्याने सांगितलं की, रविवारी रेश्मा बेगम आणि इतरांनी 'दिल्ली मोमोज' नावाच्या फूड स्टॉलवरून मोमोज खाल्ले होते. चिंतल बस्ती येथे हा स्टॉल जवळपास तीन महिन्यांपूर्वी बिहारहून आलेल्या अरमान आणि त्याच्या पाच मित्रांनी सुरू केला होता. याप्रकरणी पोलिसांनी मोमोज स्टॉल लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, महिलेच्या मृत्यूचे कारण आणि तिच्या आजारांचा तपास केला जात आहे. 
 

Web Title: hyderabad woman dead after eating momos fifteen people fall ill in banjara hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.