हैदराबादेत बालविवाह रोखणार! तेलंगण प्रशासनाने उघडली मोहीम; काझींचे परवानेही केले रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:55 AM2017-08-23T00:55:33+5:302017-08-23T00:56:02+5:30
बालविवाह आणि अल्पवयीन मुलींचे वयस्क पुरुषांसोबत होणारे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज याविरुद्ध आता हैदराबाद जिल्हा प्रशासनाने मोहीम उघडली आहे. गरीब कुटुंबांतील मुलींवर जाळे टाकून आणि आर्थिक उलाढाल करून, असे विवाह ठरविले जातात.
हैदराबाद : बालविवाह आणि अल्पवयीन मुलींचे वयस्क पुरुषांसोबत होणारे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज याविरुद्ध आता हैदराबाद जिल्हा प्रशासनाने मोहीम उघडली आहे. गरीब कुटुंबांतील मुलींवर जाळे टाकून आणि आर्थिक उलाढाल करून, असे विवाह ठरविले जातात. यात मध्यस्थ आणि एजंट यांची महत्त्वाची भूमिका असते. विदेशातील लोकांकडून मोठी रक्कम घेऊन, असे प्रकार होत असल्याचेही उघड झाले आहे.
गत आठवड्यात एका महिलेने अशी तक्रार केली होती की, आपली नणंद आणि तिचा नवरा यांनी तीन महिन्यांपूर्वी आपल्या १६ वर्षांच्या मुलीचा विवाह एका ओमान नागरिकाशी लावला आणि त्याबदल्यात पाच लाख रुपये घेतले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ओमानमधून या मुलीला परत आणण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.
हैदराबादेतील बालसुरक्षा अधिकारी इम्तियाज रहिम यांनी सांगितले की, जुन्या शहरात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची संख्या गत काही वर्षांत कमी झाली आहे. एक बदल दिसून येत आहे, पण जुन्या शहरात अजूनही असे विवाह होताना दिसत आहेत. कारण मध्यस्थ आणि दलाल पैशांचे आमिष दाखवून असे विवाह ठरवितात. त्यामुळे विवाह निश्चित करण्यापूर्वी नवरदेवाच्या वयाची माहिती घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे विवाह करून देण्यात येत आहेत, हे दिसून आल्याने आम्ही काही काझींचे परवाने रद्दही केले आहेत. (वृत्तसंस्था)
मशिदीच्या माध्यमातून समाजाची जागृती करणार
आता आम्ही मशिदीच्या माध्यमातून समाजाची जागृती करणार आहोत. अशा प्रकारचे विवाह रोखण्यासाठी समाजात संदेश पोहोचविणार आहोत. मशिदीतूनही असे संदेश देण्यासाठी आम्ही वक्फ बोर्डाला विनंती करणार आहोत. अशा व्यवहारातून विवाह लावणाºया रॅकेटचा पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला आहे. विदेशी लोक शोषणासाठी मुलींची खरेदी करीत असल्याचेही दिसून आले आहे. विशेषत: गरीब कुटुंबांवर एजंटच्या माध्यमातून असे जाळे टाकले जाते.